SUV : भारतीय ऑटोमोबाइल सेक्टरमधील एसयुव्ही सेगमेंटमध्ये महिंद्रा अँड महिंद्राने चांगले मार्केट कॅप्चर केले आहे. एकट्या महिंद्राचा यात मोठा वाटा आहे. नुकत्याच लाँच झालेल्या काही एसयुव्ही (SUV) ने कंपनीचा हा वाटा आणखी वाढवण्यास मदत केली आहे. विशेषत: काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या महिंद्रा एक्सयुव्ही 700 (Mahindra XUV 700) ला बाजारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या एसयुव्हीचा प्रतीक्षा कालावधी (waiting period) 24 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे आणि यानंतरही कंपनीला या कारसाठी दर महिन्याला 10 हजार बुकिंग मिळत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघता पुढील सणासुदीच्या दिवसांना लक्षात घेउन याला अधिक मागणी वाढण्याची शक्यता आहे.
महिंद्र अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितले, की महिंद्रा XUV 700 ने बाजारात लाँचिंगच्या आधीच रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 18 ते 24 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीनंतरही बुकिंग रद्द करण्याचे प्रमाण केवळ 10-12 टक्के आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, XUV700 खूप यशस्वी ठरली असून आम्ही दर महिन्याला 5,000 वाहनांची निर्मिती करत आहोत. आता उत्पादन क्षमता दरमहा 9-10 पेक्षा जास्त वाढवण्याची तयारी सुरू आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरचा पुरवठा सुधारणे अपेक्षित आहे आणि त्यामुळेच कंपनी उत्पादन वाढवत असल्याने प्रतीक्षा कमी होणार आहे.
कंपनीने म्हटले आहे, की त्यांना आतापर्यंत एकूण 1.70 लाख बुकिंग मिळाले असून त्यामध्ये सुमारे 78 हजार एकट्या XUV 700 साठी आहेत. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये XUV 700 पेट्रोल व्हेरिएंटसाठी बुकिंग सुरू केली होती. चिपच्या कमतरतेमुळे कंपनीला मागणीनुसार XUV 700 वितरित करण्यात अडचणी येत आहेत. अलीकडेच कंपनीने या एसयुव्हीच्या किमतीतही वाढ केली होती. एप्रिलपासून ही SUV 78,311 रुपयांनी महाग झाली आहे. सध्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्राची ही SUV 13.18 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम दराने उपलब्ध आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच इलेक्ट्रिक एसयुव्ही आणण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक XUV 300 पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लाँच करण्याची योजना आहे. याचा अर्थ XUV300 चा इलेक्ट्रिक अवतार मार्च 2023 पर्यंत बाजारात येईल. जेजुरीकर यांनी याबाबत सांगितले. आम्ही XUV 300 ची इलेक्ट्रिक आवृत्ती लाँच करणार असून पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ती बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे.