देशात गेल्या काही वर्षात रस्त्यांचं मोठं जाळं तयार झालं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फुटली असून एखाद्या ठिकाणी जाण्याचा वेळही कमी झाला आहे. गाड्या ठरावीक वेगाने आरामात धावू शकतात असं रस्त्यांचं नेटवर्क तयार झालं आहे. पण या रस्त्यांवरून जाताना अनेकदा नियंत्रण सुटल्याने अपघातही होतात. त्यामुळे योग्य सेफ्टी रेटिंग असलेली गाडी घेण्याकडे कारप्रेमींचा कल असतो. गेल्या काही वर्षांपूर्वी कारची अपघात चाचणी ही विदेशात होत होती. ग्लोबल एनसीएपीच्या माध्यमातून ही चाचणी होत होती. पण आता भारत एनसीएपीच्या माध्यमातून देशात अपघात चाचणी घेतली जात आहे. या चाचणीतून गाडीला सेफ्टी रेटिंग दिलं जाते. भारत एनसीएपीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गाड्यांना सेफ्टी रेटिंग दिलं गेलं आहे. यात टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या कार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का गाडीची अपघात चाचणी घेताना वेग किती असतो ते, नसेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
भारत एनसीएपीच्या माध्यमातून गाडीची अपघात चाचणी वेगवेगळ्या बाजूने घेतली जाते. त्यामुळे वेगळ्या अँगलने अपघात चाचणी घेताना स्पीडही वेगवेगळा असतो. एखाद्या ऑब्जेक्टवर समोरून धडक देताना गाडीचा स्पीड हा 64 किमी प्रतितास असतो. तर बाजूने अपघात चाचणी घेताना हा स्पीड 50 किमी प्रतितास इतका असतो. तर पोल साईट इम्पॅक्ट टेस्टसाठी स्पीड हा 29 किमी प्रतितास असतो. या चाचणीतून प्रौढ आणि लहान मुलांना अपघातात किती दुखापत होण्याची किती शक्यता हे ठरवलं जातं. त्यानुसार 0 ते 5 हे स्टार सेफ्टी रेटिंग दिलं जातं.
नुकतंच भारत एनसीएपीकडून काही गाड्यांना पाच स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. यात टाटा कर्व/कर्व इव्ही,टाटा नेक्सन/नेक्सन ईव्ही, टाटा पंच ईव्ही, टाटा हॅरिअर, टाटा सफारी, सिट्रॉन बासाल्ट, महिंद्रा एस्कयुव्ही 3एक्सओ, महिंद्रा एक्सयुव्ही 400 ईव्ही, महिंद्रा थार रोक्स या गाड्यांना भारत एनसीएपीकडून सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. पाच स्टार रेटिंग मिळालेली कार सर्वात सुरक्षित गणली जाते. मोठ्या अपघाततही जीव वाचण्याची खात्री असते. तर 0 ते 2 स्टार असलेल्या कारमध्ये अपघातात जीव वाचणं कठीण असतं. त्यामुळे कारप्रेमी पाच स्टार रेटिंग असलेली कार घेण्यासाठी आग्रही असतात.