नवी दिल्ली : यामाहा आरएक्स100 (Yamaha RX100 Launch) ही तरुणाची दिल की धडकन बाईक लवकरच बाजारात नवीन रुपात येते आहे. या दुचाकीचे बाईकप्रेमींवर गारुड आहे. या बाईकने धुमाकूळ घातला होता. तरीही या दुचाकीचे उत्पादन थांबविण्यात आले होते. आता कंपनी पुन्हा Yamaha RX100 बाजारात उतरविणार आहे. त्यामुळे बाईक प्रेमींच्या आनंदाला पारावार उरला नाही. यामाहा इंडियाचे चेअरमन इशिन चिहाना यांनी ही खूशखबर दिली आहे. कंपनीने मुद्दामहून RX100 चे नाव इतर बाईकशी जोडले नव्हते. कारण कंपनी स्वतः या दुचाकीचे उत्पादन करणार होती. कंपनीच्या या घोषणेमुळे तरुणाईला दमदार दुचाकीवर दूरच्या सफरीचा आनंद लुटता येईल.
अर्थात या दुचाकीत आता नव्या जमान्याची समीकरणे असतील. तसेच केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन ही करावे लागणार आहे. केंद्र सरकारने BS6 अंतर्गत जो मापदंड घालून दिला आहे, त्यानुसार OG RX100 चे दोन स्ट्रोकचे इंजिन वापरता येणार नाही. पण त्याने दुचाकीच्या आवाजावर आणि कामगिरीवर कसलाच परिणाम होणार नाही.
नवीन RX100 मध्ये मोठे इंजिन असेल, असे मीडियातील अहवालात म्हटले आहे. यामाहा इंडियाच्या चेअरमनने सांगितले की, आरएक्स100 तिच्या डिझाईन, किलर लूक, आवाज आणि कामगिरीवर अजून बाईकप्रेमींच्या लक्षात आहे. त्यामुळे हे सर्व फिचर्स कायम ठेवत, मोठ्या इंजिनाचा विचार करण्यात येणार आहे.
नवीन यामाहामध्ये 100cc चे इंजिन नसेल. तर त्यापेक्षा मोठे इंजिन बसविण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, इंजिन कोणतेही वापरण्यात येईल, त्याविषयी अद्याप कंपनीने खूलासा केला नाही. तरीही चाहते या बाईकच्या प्रतिक्षेत आहेत.
यामाहाच्या स्कूटर मध्ये सध्या 125 सीसीचं इंजिन आहे. याशिवाय 150 सीसी आणि 250 सीसी इंजिनच्याही दुचाकी आहेत. यामधील कोणत्याही इंजिनचा वापर कंपनी करु शकते. पंरतु, दाव्यानुसार कंपनी 125 सीसी अथवा 150 सीसीचं इंजिन वापरु शकते.
परंतु, बाजारातील कट्टर प्रतिस्पर्धी रॉयल एनफिल्डला टक्कर द्यायची असल्यास यामाहा, 250cc इंजिनचीही निवड करु शकते. त्यामुळे यामाहाला रॉयल एनफिल्डच्या 350 सीसीच्या बाईकशी दोन हात करता येईल.
रॉयल एनफिल्ड अगोदर बाईक प्रेमींची पहिली क्रश अर्थातच Yamaha RX 100 ही होती, हे विसरुन कसं चालेलं. बाईक प्रेमींना या नवीन बाईकसाठी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे. ही बाईक 2026 पर्यंत लॉन्च होऊ शकते.