मुंबई : भारतीय स्कूटरप्रेमींपुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे निवड करताना संभ्रम निर्माण होतो. पण चोखंदळ ग्राहक फीचर्स आणि किंमत पाहून आपल्यासाठी योग्य स्कूटर निवडतात. जापानी कंपनी यामाहानं ही बाब लक्षात घेऊन आपल्या दोन स्कूटरमध्ये अपडेट केले आहेत. 1 एप्रिल 2023 पासून बीएस 6 पेज 2 नियम लागू होणार आहे. त्यामुळे कंपन्याही भविष्याच्या दृष्टीकोनातून आपल्या प्रोडक्टमध्ये अपडेट करत आहेत. यामाहाने यापूर्वी आपल्या बाइटमध्ये अपडेट केले असून आता स्कूटरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. कंपनीने सोमवारी 125 सीसी असलेल्या Fascino आणि RayZR स्कूटर नव्या ढंगात लाँच केल्या आहेत. या शिवाय कंपनीने रे झेड आर स्ट्रीट रॅली 125 एफआय हायब्रिड स्कुटरही लाँच केली आहे. लूकच्या बाबतीत म्हणायचं तर, फॅसिनो न्यू रेट्रो स्टाईलमध्ये आकर्षक अवतारात आहे. तर रेझेडआर ही स्कुटर स्पोर्टी स्टाईलमध्ये लक्ष वेधून घेते.असं असलं तरी मुळ ढाच्याला हात लावलेला नाही.या दोन्ही स्कुटर रियल टाइम एमिशनुसार तयार करण्यात आल्या आहेत.
यामाहानं या दोन्ही स्कुटरमधून कार्बन उत्सर्जन कमी होईल या दृष्टीने अपग्रेडेशन केलं आहे. यासाठी इंजिनमध्ये काही बदल केल्याने बीएस 6 नियमात बसत आहे.त्याचबरोबर दोन्ही स्कुटरमध्ये एलईडी हेडलाइट्स, टेल लाइट्स, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी, फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रियर सिंगल साईड शॉक एब्जॉर्बरसारखे फीचर्स दिले आहेत. फॅस्किनो नव्या डार्क मॅट ब्लू रंगात आहे. तर रेझेडआर हायब्रिड आकर्षक मॅट ब्लॅक आणि लाइट ग्रे वर्मिलियन रंगात उपलब्ध आहे.
यामाहाच्या रे झेड आर आणि रे झेड आर स्ट्री रॅली आणि फॅसिनोमध्ये कंपनीने 125 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन दिलं आहे. फ्यूल इंजेक्शन आणि हायब्रिड तंत्रज्ञानासह आहे. यामुळे स्कुटर्समध्ये 8.2 बीएचपी पॉवर आणि 10.3 एनएम टॉर्क मिळतो. तिन्ही स्कूटरचं इंजिन इथोनॉल 20 साठी अपडेट केलं आहे.तसेच ओबीडी 2 सेंसरही दिलं आहे. यामुळे इंजिनची माहिती वेळोवेळी मिळणार आहे.
दोन्ही स्कुटर माइल्ड हायब्रिड सिस्टमसह एका लिटरवर 60 किमीपर्यंत मायलेज देत असल्याचा दावा कंपनी करते.सीटखाली 21 लीटर स्टोरेज आहे. 2023 फॅसिनोची किंमत 91 हजार रुपयांपासून सुरु होते. तर नव्या रेझेडआरची किंमत 89 हजारांपासून सुरु होते.