Marathi News Ayodhya Experience the joyous celebration of 'Yachi Dehi Yachi Dola' by doing Ganga Aarti MLA Rohit Pawar
Rohit Pawar : गंगाआरती करुन ‘याची देही याची डोळा’ आनंद सोहळा अनुभवला – आमदार रोहित पवार
वाराणसीमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर अनेक घाट आहेत. होळकर घाट, सिंदिया घाट, भोसले घाट अशा मराठी माणसांनी बांधलेल्या घाटांचाही यामध्ये समावेश आहे. गंगेच्या पात्रात होडीने प्रवास करुन या घाटांनाही आम्ही भेटी दिल्या.
1 / 8
आमदार रोहित पवार आपल्या कुटुंबियांच्यासोबत आयोध्या, वाराणसीच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील काही क्षणचित्रे आपल्या सोशल मीडियावर शेअर
केले आहेत. यासोबत त्यांनी एका पोस्टही लिहिली आहे. हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचं तिर्थक्षेत्र कोणतं असेल तर ते गंगा नदीच्या तीरावर वसलेलं वाराणसी. मुक्ती आणि शुद्धीकरणासाठी देशभरातून असंख्य भाविक इथं नियमित येत असतात. वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आम्हीही वाराणसीमध्ये आलो. वाराणसी हे हिंदू धर्मासाठी सात पवित्र शहरांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. प्रसिद्ध संत कबीर यांचीही जन्मभूमी वाराणसी आहे.
2 / 8
इथं अनेक विशाल मंदिरांव्यतिरिक्त, घाट आहेत. हे स्थळ केवळ भारतीयांसाठीच नाही तर परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचंही केंद्रबिंदू आहे. भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसीमध्ये गंगा नदीच्या तीरावर आहे. शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, गोस्वामी तुलसीदास यांसारख्या अनेक संत आणि महापुरुषांनी या मंदिराला भेट दिली आहे. या मंदिराला साडेतीन हजार वर्षांचा इतिहास आहे.
3 / 8
या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला परंतु त्यानंतर पुन्हा ते बांधले गेले. सध्याचं मंदिर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७८० मध्ये बांधलं. या मंदिराशी नातं सांगणारा हा इतिहास माझ्यासाठी विशेष जिव्हाळ्याचा आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म ज्या चौंडीमध्ये झाला त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालीय. त्यामुळं सध्याच्या श्री विश्वनाथ मंदिराचा हा इतिहास माझ्यासाठी विशेष आस्थेचा भाग आहे.
4 / 8
वाराणसीला आलेल्या प्रत्येक भाविकासाठी गंगाआरती ही महत्त्वाची पूजा असते. गंगाआरतीच्या आधी पूजा केली जाते आणि या पुजेला बसण्याचा मान योगायोगाने आम्हाला मिळाल्याने तर आनंदाला पारावार उरला नाही. या गंगाआरतीच्या वेळी असंख्य दिव्यांनी आणि त्यांच्या प्रतिबिंबांनी गंगेचं पात्र उजळून निघतं. जणूकाही नभोमंडलच इथं अवतरल्याचा भास यावेळी निर्माण होतो. आम्हीही गंगाआरती करुन ‘याची देही याची डोळा’ हा आनंद सोहळा अनुभवला आणि यामुळं मनाला अतीव प्रसन्नता लाभली. यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या अनेक मराठी माणसांचीही इथं भेट झाली.
5 / 8
या मंदिरात आणि पुरातन कालभैरवनाथ मंदिरातही जाऊन दर्शन घेतलं. जातीय आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेले प्रसिद्ध संत रोहिदास यांच्या मठातही भेट दिली.बनारस विश्वविद्यालयाला भेट देण्याचा योगही या दौऱ्यात आला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण मिळावं म्हणून पंडित मदन मोहन मालवीय, दरभंगाचे महाराज रामेश्वर सिंग, बनारसचे महाराज प्रभू नारायण सिंग, सुंदर लाल आणि होमरूल लीगच्या जनक डॉ. ॲनी बेझंट यांनी बनारस इथं विद्यापीठ स्थापन केलं.
6 / 8
प्राचीन भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासासोबतच या कोट्यवधी गरीब जनतेचं जीवनमान विज्ञानाच्या मदतीनं कसं सुधारता येईल आणि भारतीयांना हे विज्ञान आपल्याच देशात कसं शिकता येईल, हा उद्देशाने या विद्यापीठाच्या स्थापनेमागं होता. आज हजारो विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या विद्यापीठातील सेंट्रल लायब्ररीलाही भेट दिली. बनारस विद्यापीठात १३ लाख पुस्तकं असून त्यापैकी ९ लाख पुस्तकं या लायब्ररीमध्ये असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. एवढी समृद्ध लायब्ररी पाहून मी तर थक्क झालो. सयाजीराव गायकवाड ग्रंथालयाला भेट देण्याचीही संधी मिळाली. या दोन्ही ठिकाणी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशीही चर्चा केली.
7 / 8
वाराणसीजवळच सारनाथ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. याच ठिकाणाहून भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. लुंम्बिनी, बोधगया, कुशीनगर आणि सारनाथ हे बौद्ध धर्मातील प्रमुख चार तिर्थ आहेत. त्यापैकी सारनाथ हे एक आहे. जैन आणि हिंदू धर्मातही सारनाथला एक महत्त्व आहे. जैन धर्मातील अकरावे तिर्थंकर श्रेयांसनाथ यांचं हे जन्मस्थळ आहे.
8 / 8
वाराणसीजवळ असल्याने इथंही आवर्जुन भेट दिली. मौर्य साम्राज्याचे सम्राट अशोक यांनी आपल्या कार्यकाळात अनेक स्तूप उभारले. त्यामध्ये चतुर्मुख सिंहस्तंभ, भगवान बुद्धाचं मंदिर, धामेख स्तूप, चौखन्डी स्तूप, म्युझियम, जैन मंदिर, मूलंगधकुटी यांचा समावेश होतो. यापैकी धमेख स्तूपला आम्ही भेट दिली. सारनाथमधील ही एक आकर्षक वास्तूरचना आहे.