देशात नवीन सरकार सत्तास्थानी आले आहे. या महिन्याच्या अखेरच्या सत्रात केंद्रीय बजेट सादर होणार आहे. या बजेटकडे अर्थशास्त्रज्ञ, गुंतवणूकदार, उद्योगपती, व्यापारी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. पण केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा आणि किती वाजता सादर होणार याविषयी अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे. काहींच्या मते बजेट 22 जुलै तर काहींना 24 जुलै रोजी बजेट सादर होईल असे वाटते. याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. काय आहे नवीन अपडेट?
निर्मला सीतारमण करणार विक्रम
अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करतील. सीतारमण यांचा हा 7 वा अर्थसंकल्प असेल. यासह सर्वाधिक वेळा बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. यापूर्वीचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी 6 वेळा बजेट सादर केले होते.
मग कोणत्या दिवशी सादर होणार बजेट
सूत्रांच्या माहिती नुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार 22 जुलै ऐवजी 23 अथवा 24 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करतील. सकाळच्या सत्राच्या अखेरीस 11 वाजता बजेटला केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी मिळेल. निर्मला सीतारमण या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्थसंकल्पाविषयी माहिती देतील. त्यानंतर त्या लोकसभेत पोहचतील. त्यांचे बजेट भाषण दुपारी 1:30 ते 2 तासांचे असेल.
लवकरच मान्सून सत्राची घोषणा
18 व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर सर्व सदस्यांना शपथ देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 24 जून रोजी संसद सत्राची सुरुवात झाली होती. 3 जुलै रोजी ते संपले. लवकरच आता मान्सून सत्राची घोषणा होईल. त्याची सुरुवात 22 जुलै रोजी होईल. बजेटपूर्वी सरकार आर्थिक सर्व्हे सादर करेल. यावेळी अंतरिम बजेट सादर करण्यापूर्वी सरकारने आर्थिक सर्व्हे सादर केला नव्हता.
ज्येष्ठ नागरिकांवरील कराचे ओझे होणार कमी
देशभरातील करदात्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा क्रमांक मोठा आहे. विविध उत्पन्न स्त्रोतातून त्यांची कमाई होते. सध्या महागाईने कहर केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना औषधांचा खर्च आणि महिन्याचा खर्च भागविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारत सरकार ज्येष्ठ नागरिकांवरील आयकराचे ओझे कमी करु शकते.