बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे. ही मागणी जुनीच आहे. पण आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात पुन्हा सत्तास्थानी आले आहे. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) नेते नितीश कुमार आणि तेलगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या दोघांनी यापूर्वीच केंद्र सरकारकडे त्यांच्या मागण्यांचा खलिता पाठवला आहे. त्यात बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
काय म्हटले मंत्री
बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या मनातील गोष्ट सार्वजनिक केली. पूर्वी बिहारला विशेष पॅकेज मिळत होते. त्यात केंद्र सरकार 90 टक्के तर राज्य सरकारचा वाटा 10 टक्के होता. आता हे प्रमाण 50-50 असे झाले आहे. बिहारवरील हे ओझे कमी झाले आणि केंद्राने मोठा वाटा उचलला तर विकास होईल. आता या विषयीचा निर्णय केंद्राने घ्यायचा आहे. विशेष राज्याचा दर्जा नाही मिळाला तर कमीत कमी विशेष पॅकेज तरी राज्याला मिळायला हवे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पण विशेष राज्याच्या दर्जासाठी प्रयत्न सुरु असल्याचा सूर त्यांनी आळवला.
अधिकाऱ्यांसमोर का वाकले नितीश कुमार?
बिहार सरकारमधील मंत्री चौधरी यांनी इतर विषयावर पण मत व्यक्त केले. रुपौली पोट निवडणुकीत जनता दल (संयुक्त) बहुमताने विजयी होईल असे ते म्हणाले. गंगा पाथवे उद्धघाटनावेळी नितीश कुमार हे अधिकाऱ्यांसमोर वाकले होते. त्याची एकच चर्चा झाली होती. त्याविषयी चौधरी यांनी मत व्यक्त केले. प्रत्येकाचे आपआपले मत असते. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी 18 वर्षांपर्यंत मुख्यमंत्री पद सांभाळले आहे. त्यांनी अत्यंत विनयशीलतेने अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचा दावा त्यांनी केला. पण लोक नाहक मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नितीश कुमार आणि चंद्रबाबू किंगमेकर
16 खासदारांसह तेलगू देसम पक्ष तर 12 खासदारांसह जनता दलाचे (संयुक्त) 12 खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इच्छित आकडा गाठता आला नाही. त्यांना तिसऱ्यांदा सरकार स्थापन्यासाठी या दोन्ही पक्षांची मदत झाली. या आघाडी सरकारमध्ये आता घटक पक्षांची मर्जी सुद्धा भाजपला सांभाळावी लागणार आहे. यावेळी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.