नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारचा 2024च्या निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी केंद्र सरकार देशातील आम जनतेला काय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासकरून शेतकरी, हेल्थ सेक्टर, उद्योग आणि नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होतात याकडे देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या आहेत. तर अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड हे देवपूजा करूनच संसदेत पोहोचले. सकाळी 11 वाजता सीतारामण देशाचा बजेट सादर करणार आहेत.
आज सकाळी 11 वाजता बजेट सादर केला जाणार आहे. त्यामुळे बजेटचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या आहेत. बजेटला जाण्यापूर्वी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी देवपूजा केली. घरात देवाची आरती केली. देवाचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतरच ते संसदेकडे जायला निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवादही साधला.
आजच्या अर्थसंकल्पातून जनतेला काय मिळणार? असा सवाल भागवत कराड यांना करण्यात आला. त्यावर सामान्य जनतेला काय मिळणार हे तुम्हाला 11 वाजता कळेल. तूर्तास मी कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही. मी एवढंच सांगतो, 11 वाजता बजेट सादर होणार आहे. त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असं भागवत कराड म्हणाले.
कोविडनंतर देशाची रिकव्हरी चांगली झाली आहे. इकॉनॉमी सर्व्हे पाहिला तर प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती झाली असल्याचं दिसून येतं. इतर देशाच्या तुलनेत आपली प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014मध्ये सत्तेत आले. तेव्हा आपला देश 10व्या स्थानी होता. तो आता पाचव्या स्थानी आला आहे, असं त्यांनी सांगितलं.
बजेटपूर्वी मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. त्यानंतर कॅबिनेट बैठक होईल. नंतर आज 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, भागवत कराड हे संसदेत पोहोचले. संसदेत त्यांनी निर्मला सीतारामण यांची भेट घेतली. सीतारामण आणि कराड यांनी हातात बजेटची कॉपी घेऊन मीडियाला फोटोही दिले. त्यानंतर हे दोन्ही नेते राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले.