नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaran) यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण 2022 (Economic Survey 2022) सादर केले. या अहवालाद्वारे त्यांनी चालू आर्थिक वर्षात (2021-22) अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आगामी आर्थिक वर्षासाठी (2022-23) अर्थव्यवस्थेच्या संभाव्य स्थितीची सविस्तर माहिती दिली. आर्थिक पाहणी अहवालात चालू आर्थिक वर्षाचा विकास दर (GDP) हा 9.2 टक्के वर्तवण्यात आला आहे. हे आर्थिक सर्वेक्षण देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले आहे. कोरोना महामारीतून अर्थव्यवस्था सावरत असून, पुढील आर्थिक वर्षात विकासाला वेग येईल, असा विश्वास यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जाणून घेऊयात आर्थिक सर्वेक्षण 2021-22 मधील प्रमुख मुद्दे
1) 2021-22 मध्ये जीडीपीमध्ये 9.2 टक्के वाढ अपेक्षीत
2) 2022-23 मध्ये जीडीपी 8.0-8.5 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
3) 31 डिसेंबर 2021 रोजी परकीय चलन राखीव 633.6 अब्ज डॉलरवर पोहोचले.
4) जीडीपीच्या प्रमाणात सामाजिक सेवांवरील खर्च 2014-15 मधील 6.2 टक्क्यांच्या तुलनेत 2021-22 मध्ये 8.6 टक्क्यांनी वाढला.
5) अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासह 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीत रोजगार निर्देशक पूर्व-प्रकोप स्तरावर परतला.
6) चालू आर्थिक वर्षात 75 कंपन्यांनी आयपीओ द्वारे तब्बल 89,066 कोटी रुपये उभारले. गेल्या दशकभरातील हे सर्वाधिक प्रमाण आहे.
7) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महागाईत घट होऊन ती 5.2 टक्क्यांवर आली.
8) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अन्न महागाईत 2.9 टक्क्यांची घट .
9) रेल्वेच्या भांडवली खर्चात पाच पटीने वाढ.
10) 2020-21 मध्ये रस्त्यांची बांधकामे प्रतिदिन 36.5 किमी पर्यंत वाढले. मागील वर्षीच्या तुलनेत 30.4 टक्क्यांनी वाढ.