नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर होण्यास आता अवघा आठवडा उरला आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे पूर्ण बजेट आहे. या बजेटमधून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. महागाई आणि कर्जावरील वाढत्या व्याजदराने नागरिक त्रस्त आहेत. त्यांना या बजेटमध्ये मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे. दरवर्षी बजेट सादर होण्यापूर्वी हलवा सोहळा (Halwa Ceremony) साजरा केला जातो. कोरोना काळात हलवा सोहळ्याला ब्रेक लागला होता. पण यंदा हलवा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे हलवा सोहळा दिल्लीत जरी होत असला तरी अर्थसंकल्पातून हा गोडवा सर्वसामान्यांना मिळेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गुरुवारी बजेट तयार करण्यापूर्वी हलवा सेरेमनी साजरी करण्यात येईल. हलवा सोहळा हा या बजेटसाठी काम करणाऱ्या सर्वांसाठी श्रम परिहार समजल्या जातो. ही परंपरा अनेक दशकांपासूनची आहे. बजेट तयार करण्यासाठी अर्थखात्यातील आणि इतर विभागातील कर्मचारी, अधिकारी, रात्रंदिवस राबतात. त्यांच्यासाठी हा पारंपारिक कार्यक्रम घेण्यात येतो.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. आता कोरोनाचे मळभ कमी झाल्याने यंदा हलवा सोहळा रंगणार आहे. बजेट तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात हलवा सोहळा होतो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या हाताने पारंपारिक पद्धतीने कढईतील हलवा देतात. दिल्ली मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असते.
बजेटची तयारी पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी हलवा सोहळा करण्यात येतो. बजेट तयार झाल्याचा हा एकप्रकारे संकेत असतो. या सोहळ्यात अर्थ मंत्रालयातील मोठे अधिकारी, मंत्री सहभागी होतात. हा एकप्रकारे गेट टू गेदरचा कार्यक्रम असतो.
बजेटसंबंधीची कोणतीही माहिती बाहेर पडू नये, यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांसमेत, सचिव आणि इतर कर्मचारी अर्थ मंत्रालयाच्या परिसरात ठाण मांडून राहतात. जवळपास 100 कर्मचारी या परिसरात राहतात. ते बाहेर पडत नाहीत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केल्यानंतर त्यांची सूटका होते.
भारतीय संस्कृती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन करतात. बजेटचे अवघड कार्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने लिलया पूर्ण होते. त्यामुळे तोंड गोड करुन हा सोहळा साजरा करण्यात येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला रंग चढतो.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या 10 नार्थ ब्लॉक परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. जोपर्यंत बजेट सादर होत नाही. तोपर्यंत कर्मचारी याच परिसरात राहतात. या ठिकाणी त्यांच्या निवासाची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात येते.