नागपूर : विदर्भात (Vidarbha) ताडोबा अंधेरी, नवेगाव-नागझिरा, पेंच, बोर, मेळघाट अशी मोठी अभयारण्य आहेत. या अभयारण्यालगच्या गावांत मानव-वन्यजीव (Wildlife) संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. वन्यप्राणी गावात शिरतात. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ५० पेक्षा जास्त जणांना वाघांनी बळी घेतला. याशिवाय अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. वन्यप्राणी जंगलालगतच्या शेतात घुसतात. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या नुकसानाची योग्य प्रमाणात भरपाई मिळत नाही. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेल्यानंतर कुटुंबीय उघड्यावर पडतात. अशा अभयारण्यालगतच्या गावांसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज घोषित करण्यात गरज आहे.
पर्यटन विकासावर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करते. ताडोब्यात वाघांची संख्या जास्त झाली. हे वाघ आता आजूबाजूच्या जंगलातही नेले जात आहेत. पण, जंगलाशेजारी राहणाऱ्यांना या वन्यप्राण्यांचा अतिशय त्रास होतो. जंगली जनावरं येऊन उभं पीक निस्तनाबूत करतात. हरीण येतात गहू खाऊन जातात. डुक्कर येतात. चन्याची नासाडी करून जातात.
अशावेळी जंगलाशेजारी सौरकुंपण करणे गरजेचे आहे. सरकार काही प्रमाणात या दिशेने पाऊलं उचलतं आहे. पण, गावाशेजारील शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळं यासाठी विशेष पॅकेज शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे.
जंगलाशेजारील काही गावांचे पुनर्वसन रखडले आहे. गावात सोलर लाईट, कुंपण, लावणे आवश्यक आहे. जंगलात जाऊ नये, यासाठी गॅस सबसिडी मध्यंतरी देण्यात आली. पण, त्यानंतर सिलिंडर मिळणं बंद झाल्यानं पुन्हा लोकं काड्यांचा वापर इंधनासाठी करतात.
तेंदुपत्त्याच्या काळात जंगलात प्राण्यांपासून धोका असतो. अशावेळी नुकसान झाल्यास योग्य प्रमाणात मदत दिली जात नाही. यासाठी केंद्रानं विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांना आहे. सौरऊर्जेवरील अनुदानात वाढ केली पाहिजे. गरजेनुसार, सौरपंप दिले गेले पाहिजे. तसेच जंगली प्राणी शेतात येऊ नये, यासाठी सौरऊर्जेचे कुंपण करणे आवश्यक असल्याचं जंगलाशेजारील नागरिकांनी मागणी आहे.