जर तुम्हाला घरभाड्यासाठी 20,000 रुपये द्यावे लागले तर? कोणी तरी तुम्हाला सल्ला देईलच की त्यापेक्षा घर खरेदी करणे फायद्याचे ठरले असते. इतके भाडे भरण्यापेक्षा ईएमआय भरणे चांगले, असा सल्ला तुम्हाला कोणीही देईल. पण या दिग्गज उद्योजकाला कोणाचा सल्ला ऐकूनच घ्यायचा नाही. हा उद्योजक गुडगावमध्ये 1.5 लाख रुपये घरभाडे देतो. पण त्याने घर खरेदी करण्यावर नकार घंटा वाजवली आहे. त्याने त्याविषयीचे त्याचे कारण पण पुढे केले आहे. काय आहे त्याचे गणित?
कोण आहे हा उद्योजक
तर हा उद्योजक मराठी आहे. बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे नाव तुम्ही ऐकले असेल. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ शंतनु देशपांडे हे एक प्रसिद्ध उद्योजक आहे. ते सध्या गुडगावमध्ये राहतात. एका प्राईम लोकेशवर त्यांचे मोठे घर आहे. या घराच्या भाड्यापोटी आणि इतर खर्च मिळून ते 1.6 लाख रुपये भरतात.
काय आहे वाद
हैदराबाद येथील एक रिअल इस्टेट कंपनी एएसबीएल (ASBL) चे सीईओ अजितेश कोरुपोलू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात घरभाडे भरण्यापेक्षा ईएमआय काय वाईट आहे, असा सल्ला दिला. त्यावर शंतनु देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना ही गोष्ट काही आवडली नाही. त्यांनी लागलीच याविषयीचे त्यांचे गणित मांडले.
काय आहे गणित
बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शंतनु देशपांडे म्हणाले,“मला हे गणित समजत नाही. गोल्फ कोर्समध्ये मी 1.5 लाख रुपये भाडे देतो. मेन्टेनन्स मिळून हा आकडा 1.6 लाख रुपयांवर जातो. ज्या अपार्टमेंटमध्ये मी राहतो, त्याची किंमत 7 ते 8 कोटी रुपयांपर्यंत आहे. जर मला ही अपार्टमेंट खरेदी करायची असेल तर कर्ज घ्यावे लागेल. 70 टक्के कर्ज घ्यायचे म्हटले तरी 6 कोटी रुपये द्यावे लागतील. त्यासाठी दरमहिन्याला 6-7 लाख रुपये ईएमआय भरावा लागेल. त्यामुळे घर खरेदी करणे निरर्थक ठरते.”
घर बदलवणे सोपे
घर बदलणे सोपे असल्याचे देशपांडे म्हणाले. त्यासाठी जास्तीत जास्त 15 दिवस लागतील. माझे ऑफिस बदलले तर मला त्याच्या जवळपासच घर असावे असे वाटते. त्यामुळे मला व्याज द्यायचे नाही तर घरभाडे भरायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.