नवी दिल्ली : भारतीय बँका, विमा कंपन्यांकडे विना दावा केलेली मोठी रक्कम, ठेव (Unclaimed Amount) सातत्याने वाढत आहे. अनक्लेम्ड डिपॉझिट, शेअर, लाभांश, म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांसमोर या रक्कमेचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे. या रक्कमेवर दावा सांगायलाच कोणी येत नसल्याने आता दावेदारांचा, त्यांच्या नातेवाईकांचा, वारसदारांचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी विहित प्रक्रिया सुरु करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी त्यासाठी एक विशेष मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. शेअर आणि म्युच्युअल फंडात जवळपास एक लाख कोटी रुपये तसेच पडून आहेत. या भल्यामोठ्या रक्कमेवर कोणीच दावा केलेला नाही. यामध्ये तुमचे पण शेअर (Share), म्युच्युअल फंडात (Mutual Fund) रक्कम असेल तर तुम्हाला असा दावा करता येईल.
वारसदाराची शोध मोहीम
केंद्र सरकारचे पहिले उद्दिष्ट वारसदारांचा थांगपत्ता शोधणे आहे. त्यांना त्यांच्या कुटुंब प्रमुखाने जी काही रक्कम ठेव म्हणून ठेवली आहे, तिचा लाभ वारसांपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येणार आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात विना दावा ठेव रक्कम 48,262 कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर आरबीआयच्या वार्षिक रिपोर्टनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात 39,264 कोटी रुपयांची अनामत ठेव तशीच पडून आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशातील बँकांमध्ये सर्वात मोठी विना दावा रक्कम आहे.
विमा कंपन्या प्रभावित
जीवन विमा कंपन्यांमध्ये 31 मार्च, 2021पर्यंत 22,043 कोटी रुपयांवर कोणीच दावेदार नाही. तर नॉन-लाईफ इन्शुरस्न कंपन्यांकडे 31 मार्च, 2021 पर्यंत 1,241.81 कोटी रुपयांवर कोणीच दावा सांगितलेला नाही. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडेच 21,538.93 कोटी रुपये पडून आहेत. त्याच्यावर कोणीच दावा सांगितलेला नाही. यामध्ये 2911.08 कोटी रुपयांचे व्याज रक्कम पण समाविष्ट आहे.
इतकी रक्कम केली हस्तांतरीत
मार्केट रेग्युलेटर सेबीने माहिती दिली. त्यानुसार, म्युच्युअल फंडात 31 मार्च, 2021 पर्यंत 1590 कोटी रुपयांच्या रक्कमेवर कोणीच दावा सांगितला नाही. यामध्ये 671.88 कोटींचे अनक्लेम्ड रिडेम्पशन आणि 918.79 कोटी रुपयांचे दावा न केलेला लाभांश आहे. तसेच विना दावा शेअरची संख्या पण खूप मोठी आहे. जवळपास 117 कोटी शेअर्स गुंतवणूकदारांचे प्रशिक्षण आणि संरक्षण निधीत (IEPF) हस्तांतरीत करण्यात आले आहे.
बँक वेबसाईटवर मिळेल माहिती
अनक्लेम्ड डिपॉझिट रक्कम मिळविण्यासाठी बँकेशी संपर्क साधवा. विनादावा किती रक्कम आहे, याची माहिती बँकांच्या वेबसाईटवर मिळते. विना दावा रक्कमेवर दावा सांगण्यासाठी तुम्हाला विहित कागदपत्रे सादर करावे लागतील. यामध्ये खातेदाराचे पॅनकार्ड, जन्मतारखेचा पुरावा, नाव आणि पत्ता हे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यावरुन त्या खात्यात किती रक्कम पडून आहे, याची माहिती मिळेल.