नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : खेळण्या-कुदण्याच्या वयात मुंबईतील एका मुलाने 100 कोटी रुपयांची कंपनी उभी केली, वाचून धक्का बसला ना? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. कमी वयात दहावी, बारावी आणि पदवी घेतलेल्या मुलांच्या यशोगाथा आपण वाचल्या आहेत. पण इतक्या कमी वयात कोट्यवधींची कंपनी उभी करणे भल्याभल्या उद्योजकांना पण जमत नाही. पण या मुलाने त्याचे कर्तृत्व (Little Entrepreneur) सिद्ध केले आहे. अवघ्या 13 व्या वर्षीच त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला. या चार वर्षांत त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याचा आत्मविश्वास पाहून यशाने सुद्धा त्याच्या भाळी टिळा लावला. सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, कोण आहे तिलक मेहता (Tilak Mehta)?
कोण आहे तिलक मेहता
तिलक मेहता याने 100 कोटींची कंपनी उभी केली. अवघ्या 13 व्या वर्षी त्याने कंपनी सुरु केली. Paper n parcel असे त्याच्या कंपनीचे नाव आहे. चार वर्षांत या कंपनीने मोठी झेप घेतली. ही कंपनी सध्या 200 जणांना रोजगार देते. तिलक मेहताने पेपर एन पार्सल नावाने ही कुरियर कंपनी सुरु केली. त्याचे वडील एका लॉजिस्टिक कंपनीत काम करतात, आई गृहिणी आहे आणि त्याला एक बहिण आहे.
अशी मिळाली आयडिया
तिलक मेहता 13 वर्षांचा असताना त्याचे वडील ऑफिसमधून थकून घरी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे अनेकदा तिलक याला त्याच्या स्टेशनरी सामनासाठी वाट पहावी लागत असे. कारण थकव्यामुळे त्याचे वडील पुन्हा घराबाहेर पडत नसत. वडिलांच्या या थकव्यातूनच त्याला व्यवसायाची कल्पना सुचली. एकदिवस तो काकांकडे गेला. त्यानंतर त्याची परीक्षा होती. पण त्याने पुस्तकं सोबत नेली नाही. कुरियरच्या मदतीने पुस्तकं मागवू असे त्याला वाटले. पण पुस्तकांपेक्षा त्याचाच खर्च अधिक असल्याचे त्याला जाणवले. त्यातून त्याला कुरियर कंपनीची कल्पना सूचली.
वडिलांसोबत केली चर्चा
तिलक मेहताने त्याची ही कल्पना वडिलांना सांगितली. त्यानंतर कुरिअर सर्व्हिस सुरु केली. त्याच्या वडिलांनी पेपर एन पार्सल कंपनी सुरु करण्यासाठी त्याला निधी दिला. त्यानंतर बँकेचे अधिकारी घनश्याम पारिख यांना ही कल्पना सांगितली. त्यांनी या व्यवसायात गुंतवणूक केली.
बँकेच्या नोकरीला ठोकला रामराम
ही कल्पना घनश्याम पारिख यांना इतकी आवडली की, त्यांनी बँकेतील नोकरीला रामराम ठोकला आणि Paper n Parcel व्यवसायात स्वतःला झोकून दिले. दोघांनी मिळून पेपर एन पार्सल कंपनी सुरु केली. पारिख या कंपनीचे सीईओ आहेत.
सर्वात तरुण उद्योजक
पेपर एन पार्सल हीा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी शिपिंग आणि लॉजिस्टिक्स संबंधीत सेवा पुरविते. मोबाईल एपच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात येते. या कंपनीची उलाढाल 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. कंपनीत 200 कर्मचारी आहेत. तर 300 हून अधिक डब्बेवाले पण जोडल्या गेले आहेत. ही कंपनी दैनंदिन उपयोगातील सामान घरपोच पोहचवते.