वॉशिंग्टन : अमेरिकेच्या जवळजवळ 200 कंपन्यांनी आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) तयार करण्यासाठी भारताला पसंती दिली आहे. या कंपन्या निवडणुकीनंतर आपले केंद्र चीनमधून भारतात नेण्यास इच्छुक आहेत.
अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम’ या स्वयंसेवी समुहाने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले, “चीनऐवजी अन्य ठिकाणी पर्याय शोधणाऱ्या कंपन्यांसाठी भारतात चांगल्या संधी आहेत.” या समुहाचे प्रमुख मुकेश अघीने यांनी सांगितले, “अनेक कंपन्या माझ्याशी बोलत आहे. भारतात गुंतवणूक करुन चीनला पर्याय म्हणून ते विचारणा करत आहेत. भारतात निवडणुकीनंतर नव्या सरकारला व्यापारासाठीच्या सुधारणांमध्ये गती आणण्याबाबतही आम्ही बोलणार आहोत.”
एका मुलाखतीत बोलताना मुकेश अघी म्हणाले, “मला वाटते हे खूप संवेदनशील आहे. आम्हाला प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणायची आहे. त्यासाठी 12 ते 18 महिन्यांमध्ये यावर चर्चा करुन अधिक योग्य निर्णय घेतला जाईल. ई-कॉमर्स, माहितीचे स्थानिक ठिकाणी स्टोरेज अशा निर्णयांवरही अमेरिकी कंपन्या विचार करत आहेत.”
गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारला काय करायला हवे, असे विचारल्यानंतर अघी म्हणाले, “नव्या सरकारला सुधारणांचा वेग वाढवावा लागेल. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणायला हवी. अधिक पक्षांसोबत चर्चेवर जोर द्यायला हवा.” भारत आणि अमेरिकेमधील मुक्त व्यापार कराराचेही घनी यांनी समर्थन केले.