नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : जीवनात लक्ष्य कितीही कठिण असले तरी मेहनत आणि जिद्दीने लक्ष्य गाठणारी मंडळी काही कमी नाहीत. काहींनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. जगाने वेड्यात काढले, पण त्यांनी मार्गाक्रमण सुरुच ठेवत ध्येय गाठले. आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक माणसे कष्ट उपसताना दिसतील. त्यांच्या जिद्दीपुढे आकाश पण ठेंगणे होताना आपण पाहिले असेल. अशीची ही प्रेरणादायी गोष्ट आहे, रोहित मांगलिक (Rohit Manglik) यांची. त्यांनी वार्षिक 42 लाख रुपये पॅकेज असलेली नोकरी सोडली. त्यांनी स्टार्टअप सुरु केला खरा पण अपयशाने त्यांना चांगलेच झुंजवले. पण अपयशाने ते खचून गेले नाही. जणू नशीब आणि मेहनत पण त्यांची परीक्षा घेत होती. त्यांच्या कष्टाला अखेर यश आले. आज त्यांची कंपनी जगातील अनेक यशस्वी कंपन्यांपैकी (Startup) एक आहे.
अशी केली सुरुवात
रोहित मांगलिक यांनी 2012 मध्ये एनआयटीमधून बीटेक केले. त्यानंतर इतरांप्रमाणेच आयटी सेक्टरची वाट धरली. मोठ्या कंपन्यात त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. सर्व काही व्यवस्थीत असले तरी, त्यांना स्वतःची वाट चोखंदळायची होती. त्यांनी 2017 मध्ये नोकरीला रामराम ठोकला. ते त्यांच्या गावी फर्रुखाबाद येथे परत आले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची प्रेरणा
नोकरीत असताना स्वतःला बांधून घेतल्यासारखे त्यांना वाटत होते. नोकरीच्या कोठडीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यांनी 2017मध्ये नोकरी सोडली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी त्यांचे भेट झाली. रोहित यांनी मनातील भावना मोकळ्या केल्या. ‘स्वतःविषयी विचार करु नकोस, देशाविषयी विचार कर, यापेक्षा पण चांगले होईल’, असे मोलाचे मार्गदर्शन कलाम यांनी केले. तिथूनच स्टार्टअपची कल्पना रोहित यांना सूचली.
समुपदेशन केले सुरु
रोहित मांगलिक यांनी, नोकरी सोडल्यानंतर त्यांनी 7 कर्मचाऱ्यांसह करिअर काऊन्सिलिंग सुरु केले. पण हा प्रयोग छोट्या शहरात सुरु होता. निम शहरी भागात त्यांचा हा प्रयोग चालला नाही. मग त्यांनी लखनऊमधील पत्रकारपुरम येथे कार्यालय थाटले. येथे ही अपयशाने त्यांचा पिच्छा पुरवला.
2020 मध्ये सुरु केले स्टॉर्टअप
रोहित मांगलिक यांनी 2020 मध्ये तिसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यांनी एडुगोरिल्ला नावाचे स्टार्टअप सुरु केले. तीनच वर्षात स्टार्टअपने शैक्षणिक क्षेत्रात लांब उडी घेतली. ही कंपनी जगातील टॉप 10 कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली. एडुगोरिल्लामध्ये सध्या 300 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल जवळपास दहा कोटींचा आहे. कंपनीचा यशाचा चढता आलेख पाहून अनेक परदेशी कंपन्यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे.
अपयशातून निघाला मार्ग
दोनदा अपयशी झाल्यानंतर रोहित यांनी त्यातून मोठा धडा घेतला. त्यांना मुलांची नेमकी समस्या समजली. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारा, त्यांच्या मनातील गोष्ट ओळखणारा कोणीच नाही, हे त्यांनी हेरले आणि त्यावर काम केले. त्यांनी 2020 मध्ये तरुणांसह एडुगोरिल्ला नावाने एक एप सुरु केले. त्यांच्या कंपनीने भारतातील 3000 करिअर आणि कोचिंग इन्स्टिट्यूटसोबत करार केला आहे. त्यांच्या कोर्समध्ये जवळपास 70 हजारांहून अधिक विद्यार्थी जोडल्या गेले आहेत.