नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : देशातील बँकांमध्ये विना दावा मोठी रक्कम (Unclaimed Deposits) पडून आहे. या रक्कमेत सातत्याने वाढ होत आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने बँकेत काही ठेव ठेवली. काही रक्कम बचत खात्यात राहिली आणि खाते वापरात नसल्याने ही रक्कम तशीच पडून राहिली. आजोबा वा इतर व्यक्तींचे खाते असेल, त्याचा विसर पडला असेल आणि त्यात रक्कम असेल तर अशा विना दाव्याच्या रक्कमेवर तुम्हाला दावा सांगता येईल. सध्या एका वर्षात दावा न केलेल्या रक्कमेत 28% वाढ होऊन ती 42,270 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. पण अजून या रक्कमेवर दावेदारांनी दावा सांगितलेला नाही. या रक्कमेवर तुम्हाला कसा दावा सांगता येईल?
सरकारने दिली ही माहिती
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेमध्ये अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी माहिती दिली. त्यानुसार, बँकेत पडून असलेल्या विनादाव्याच्या रक्कमेत 28% पर्यंत वाढ झाली आहे. मार्च 2022 पर्यंत ही रक्कम 32,934 कोटी रुपये होती. मार्च 2023 पर्यंत ती वाढून 42,270 कोटी रुपये झाली. यापैकी सरकारी बँकांमध्ये 36,185 कोटी रुपये पडून आहेत. तर खासगी बँकांमध्ये 6087 कोटी रुपये पडून आहेत.
विना दावा खात्याला वाली कोण?
अनेक जण घरी न सांगता, बँकेचे खाते उघडतात. त्यात काही रक्कम ठेव ठेवतात. काही वर्ष व्यवहार केल्यानंतर या खात्यात कोणताही व्यवहार होत नाही. देशात अशी अनेक खाते निष्क्रिय आहेत. या खात्यातील मोठ्या रक्कमा तशाच पडून आहेत. खातेदार हयात नसल्याने वा खात्याचा विसर पडल्याने त्यांनी या रक्कमेवर दावा सांगितलेला नाही. दहा वर्षांत या खात्यात रक्कम टाकण्यात आली नाही अथवा रक्कम काढण्यात आली नाही तर केंद्र सरकार त्याला अनक्लेम डिपॉझिट म्हणून जाहीर करते. पुरावा सादर केल्यास ही रक्कम परत मागण्याची सोय करण्यात आली आहे.
येथे मिळवा रक्कम परत
या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक केंद्रीय, मध्यवर्ती संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्याला उद्गम (UDGAM) म्हणजे Unclaimed Deposits – Gateway to Access information असे नाव देण्यात आले आहे. जर तुमच्याकडे अशा काही रक्कमेचा पुरावा असेल तर या वेबसाईटवर जाऊन, योग्य माहिती आणि त्यासंबंधीची कागदपत्रे जमा करुन सदर रक्कमेवर दावा करता येतो. पडताळणी नंतर तुमच्या दाव्यात तथ्य आढळल्यास रक्कम तुमच्या ताब्यात देण्यात येईल.
अशी आहे प्रक्रिया
https://udgam.rbi.org.in/ या संकेतस्थळावर जा
या ठिकाणी नाव नोंदणी करा.
मोबाईल क्रमांक आणि पासवर्डचा वापर करुन लॉगिन करा
रजिस्टर क्रमांकवर ओटीपी येईल.ओटीपी टाकून पुढील प्रक्रिया करा
पॅन क्रमांक, आधार क्रमांकाचा पुरावा द्या. जन्मतारीख नोंदवा
पुढील प्रक्रियेत अनक्लेम्ड रक्कमेची माहिती मिळेल
तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत सुद्धा संपर्क साधू शकता
या 30 बँकांमध्ये जमा आहे रक्कम