नवी दिल्ली | 16 March 2024 : आठवड्यातील पाच दिवस काम आणि शनिवार, रविवार सुट्टी, हे बँक कर्मचाऱ्यांचे बहुधा स्वप्नचं ठरु शकते. यापूर्वी पाच दिवसांच्या आठवड्यावर सरकार अनुकूल असल्याचे वृत्त येत होते. तसेच लवकरच बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू होईल, असा दावा करण्यात येत होता. पण आता या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे दिसून येते. या मागणीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठे संकेत दिले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. काय म्हणाल्या अर्थमंत्री?
अफवांवर विश्वास नको
बँकांमध्ये 5 दिवसांच्या आठवड्याचे कामकाज असावे अशी मागणी होती. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्याने याविषयीचा संभ्रम दूर झाला आहे. आयआयटी गुवाहाटी येथे विकसीत भारत या कार्यक्रमात त्यांनी विचार मांडले. त्यानंतर बँक कर्मचारी, बँकेतील कामकाज, वर्क कल्चर याविषयीच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्यानंतर 5 दिवसांच्या आठवड्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
या मुद्यांवर सहमती
8 मार्च रोजी इंडियन बँक असोसिएशन आणि इतर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यात एक करार झाला. त्यात बँक कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्यावर सहमती आली. तर विविध सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 17 टक्के वाढ होणार असल्याचे समोर आले आहे. याशिवाय महागाई भत्ता आणि अनुषंगिक लाभ यावर पण सकारात्मक चर्चा झडली.
अनेक दिवसांची मागणी
बँकेत प्रत्येक आठवड्यात 5 दिवस काम असावे आणि दोन दिवस सुट्या मिळाव्यात अशी मागणी कर्मचारी अनेक दिवसांपासून करत आहेत. कर्मचाऱ्यांना आठवड्यातील दोन दिवस सुट्टी हवी आहे. प्रत्येक शनिवारी बँका बंद नसतात. महिन्यातील पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँकेत कामकाज होते.
अजून विचार नाही
कर्मचाऱ्यांना सध्या पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या शनिवारी बँकेत काम करावे लागते. तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. बँक युनियन आणि असोसिएशन यांच्यात पाच दिवसांच्या आठवड्याविषयी अनेक दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून अजून काहीही निष्पन्न झालेले नाही. निवडणुकीपूर्वी हा विषय मार्गी लागण्याची शक्यता होती. पण अर्थमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता आशा मावळली आहे.