आता महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात त्यांचं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. खेळ, मनोरंजन, राजकारण, कला, व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही महिलांची ओळख करून देणार आहोत ज्यांनी व्यवसाय जगतात खूप मोठं नाव कमावलं आहे. या महिला जगातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये आघाडीवर आहेत. जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या या महिला सांभाळत आहेत.
किरण मुजुमदार शॉ : किरण मुजुमदार या बायोकॉन लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका आहेत. त्या 1978 पासून ही कंपनी सांभाळत आहेत. भारत सरकारने किरण यांचा 1989 साली पद्मश्री आणि 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला आहे. टाईम मासिकाच्या (Time Magazine) जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. सेन्सेक्सवर बायोकॉनची मार्केट कॅप 34 हजार 644 कोटी इतकी आहे (28 जानेवारीपर्यंत).
रोशनी नाडर : रोशनी नाडर या आयटी कंपनी एचसीएलच्या कार्यकारी संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. 2019 च्या फोर्ब्सच्या जगातील 100 प्रतिभावान महिलांमध्ये त्या 54 व्या स्थानावर होत्या. आयआयएफएलच्या (IIFL) म्हणण्यानुसार, रोशनी नाडर 2019 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला होत्या. आज एचसीएलची बाजारपेठ 1.63 लाख कोटी रुपये ईतकी आहे.
जेनिफर मॉर्गन : जेनिफर मॉर्गन जर्मन सॉफ्टवेअर आणि क्लाऊड कम्प्यूटिंग कंपनी SAP च्या सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. एसएपीच्या मंडळामध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन आहेत.
गिनी रॉमेटी : गिनी रॉमेटी या तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या आयबीएमच्या (IBM) अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 2012 मध्ये त्यांना या कंपनीची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्या या कंपनीच्या सीईओ बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत. 1981 मध्ये त्या आयबीएममध्ये सिस्टिम इंजिनियर म्हणून रुजू झाल्या होत्या. हळूहळू एकेक पायरी चढत त्या कंपनीच्या अध्यक्ष आणि सीईओ या पदापर्यंत पोहोचल्या.
इंदिरा नुई : इंदिरा नुई यांना सर्वचजण ओळखतात. त्या सलग अनेक वर्षे फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत दिसत आहेत. इंदिरा यांनी बराच काळ पेप्सीकोच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा (CEO) कार्यभार सांभाळला आहे. 1994 ते 2019 अशी 25 वर्ष त्यांनी पेप्सीको कंपनी सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये अमेझॉनने कंपनीच्या संचालक मंडळामध्ये त्यांचा समावेश केला.