मुंबई : वयाच्या साठाव्या वर्षी पण थाटात जगायच असेल तर त्यासाठी रिटायरमेंटची (Retirement) सोय पण तितकीच भारी हवी. सरकारच्या माध्यमातून अनेक रिटायरमेंटच्या योजना सुरू आहेत. त्यातील एक म्हणजे अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme). या योजनेत छोट्याश्या गुंतवणुकीद्वारे वृद्धापकाळात तुम्ही खात्रीशीर पेन्शन मिळू शकतात. 36 वर्षाचा सुहास हा मजूर म्हणून काम करतो. दररोज कमाई करायची आणि तेवढाच खर्च करायचा. आता हातपाय शाबूत आहेत तोपर्यंत ठिक आहे, पण म्हातारपणाची काळजी त्यांना सतावत आहे. असे अनेक जण आहेत ज्यांना आपल्या वृद्धापकाळातील काळजी आहे. आजची बातमी ही खास त्याच्यांसाठीच आहे. अशा लोकांना अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळू शकतो. अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची (Central Government) योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब आणि असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी वयाच्या साठाव्या वर्षानंतर खात्रीशीर पेन्शन मिळेल असं नियोजन करण्यात आलंय. 18 ते 40 वर्षांमधील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो, लाभधारकास वयाच्या साठाव्या वर्षानंतर पेन्शन मिळते. 1000 रुपयांपासून 5000 रुपये महिना असे या पेन्शनचे स्वरूप असते.
तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रुपये महिना पेन्शन मिळवण्यासाठी महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील, म्हणजे रोजचे 7 रुपयांची गुंतवणूक याचप्रमाणे 1000 रुपयांच्या पेन्शन साठी महिना 42 रुपये, 2000 रुपयांच्या पेन्शन साठी 84 रुपये , 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या पेन्शनसाठी महिना 168 रुपये जमा करावे लागतील.
अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली. मार्च 2022 पर्यंत या योजनेमध्ये 4 कोटींपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 99 लाखांपेक्षा जास्त अटल पेन्शन योजनेची खाती उघडली गेली. या योजनेत सहभागी असलेल्या 80 टक्के खातेधारकांनी 1000 रुपयांचा प्लॅन घेतला आहे. 13 टक्के खातेधारकांनी 5000 रुपयांचा प्लान घेतला आहे. विशेष म्हणजे या योजनेमध्ये 44 टक्के महिला खातेधारक आहेत. एकूण सभासदांपैकी 45 टक्के सभासदांचे वय 18 ते 25 वयोगटातील आहे. ही योजना असंघटित कामगार म्हणजे मजूर, गवंडी,घरकाम करणारे न्हावी,ड्रायव्हर ,चप्पल शिवणारे, टेलर यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. सरकारी प्लॅटफॉर्मच्या ई-श्रम पोर्टलवर या क्षेत्रातील 27 कोटींहून अधिक श्रमिकांचा समावेश आहे. यात 94 टक्के लोकांची कमाई 10 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. देशातील असंघटित क्षेत्रातील मजुरांची संख्या 38 कोटी असतानादेखील केवळ 4 कोटी लोकांनीच या योजनेचा फायदा घेतला आहे. याचे कारण म्हणजे बऱ्याच लोकांना या योजनेबद्दल कोणतीही माहिती नाहीये.