नवी दिल्ली– शेअर बाजारातील घसरणीला (INDIAN SHARE MARKET) ब्रेक लागला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीचे तेजीत रुपांतर झाले. आज (गुरुवार) सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही मध्ये तेजी नोंदविली गेली. आज व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स मध्ये 503 अंकांची वाढ झाली. तर निफ्टीही 144 अंकाच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 54,252 वर पोहोचला. निफ्टी 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 16,170 वर बंद झाला. शेअर बाजारात आज 1712 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदविली गेली. शेअर बाजारात दीर्घकाळापासून नीच्चांकी स्तरावर असलेल्या अदानी समूहाच्या (ADANI GROUP) अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली. अदानी विल्मर आणि अदानी पॉवरच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट (UPPER CIRCUIT) लागू करण्यात आले. कर कंपनीचा एक शेअर 10% वाढीसह बंद झाला. जाणून घेऊया अदानी समूहाच्या शेअर्सची कामगिरी-
अदानी टोटल गॅसच्या शेअरची किंमत आज (गुरुवार) 10% च्या वाढीसह बंद झाली. एका दिवसात शेअरच्या भावात 221.65 रुपयांची वाढ नोंदविली गेली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर बुधवारी शेअर्स 2,216.95 वर बंद झाला होता. गुरुवारी शेअर्सचा भाव 2,438.60 वर पोहोचला होता.
अदानी विल्मरच्या शेअर्समध्ये आज (गुरुवारी) पहिले अप्पर सर्किट लागू करण्यात आले होते. व्यवहार बंद होण्यापूर्वी शेअर्समध्ये अचानक तेजी निर्माण झाली आणि बंद होण्यापूर्वीच आज अप्पर सर्किट लागू करण्यात आले. व्यवहार बंद होण्यावेळी 5% च्या वाढीसह 698.05 रुपयांवर बंद झाला. काल (बुधवारी) शेअर्सचा भाव 664.85 रुपयांवर बंद झाला होता.
अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये समान स्थिती पाहायला मिळाली. व्यवहाराच्या अखेरच्या वेळी शेअर्सला अप्पर सर्किट लागू करण्यात आले. शेअर्स 314.30 रुपयांवर बंद झाला. काल (बुधवारी) शेअर्स 299.35 रुपयांवर बंद झाला होता.
अदानी समूहातील उलाढाल असलेली सूचीबद्ध कंपनी अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सचा भाव 104.35 रुपयांच्या वाढीसह बंद झाला. काल(बुधवारी) शेअर्स 2,087.95 रुपयांवर बंद झाला होता आणि आज (गुरुवारी) 5% च्या वाढीसह 2,192.30 अंकांवर बंद झाला.
अदानी ग्रीनचा शेअर वाढीसह बंद झाला. दिवसभर व्यवहारावेळी तेजी-घसरणीचं चित्र राहिलं. व्यवहाराच्या अखेरीस तेजी नोंदविली गेली. शेअर्स 0.49% च्या वाढीसह 2,198.05 रुपयांवर बंद झाला.
अदानी समूहाच्या दोन मुख्य कंपन्या अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर 1.07% म्हणजेच 22.15 रुपयांच्या घसरणीसह 2,052 रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्टचा शेअर 0.55% च्या घसरणीसह 704 रुपयांवर बंद झाला.