नवी दिल्ली : हिंडनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) पोलखोलनंतरही अदानी समूहाने आता माघार घेणार नसल्याचा दावा केला आहे. अदानी समूहाच्या (Adani Group) या भूमिकेनंतर गुंतवणूकदारांचा जीव आता भांड्यात पडला आहे. अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहच नाही तर भारतीय शेअर बाजारात भयकंप आला. या कंपामुळे बाजार गडगडला. गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. गुंतवणूकदार चिकित्सक आणि सावध झाले. अदानी एंटरप्राईजेसने (Adani Enterprises) फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) बाजारात उतरवली आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ही योजना सुरु राहिल. त्यातच अहवालाने धु्माकूळ घातल्याने गुंतवणूकदारात चिंतेचे वातावरण आहे. पण अदानी समूहाने अहवालाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. आता बाजारातून मागे हटणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.
आशियातील श्रीमंत व्यक्ती आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी यांनी याविषयीचा निर्धार व्यक्त केला. अदानी समूहाच्या अदानी एंटरप्राईजेसचा एफपीओची निर्धारीत किंमत, विक्रीची तारीख आणि इतर प्रक्रिया या अहवालाने बाधित होणार नाही, प्रक्रियेनुसारच सर्व गोष्टी होतील, असे समूहाने स्पष्ट केले. शनिवारी या प्रक्रियेत कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हिंडनबर्गच्या अहवालाने शुक्रवारी बाजारात भूकंप आला. अदानी एंटरप्राईजेससह या समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांमध्ये जोरदार घसरण आली. पण अदानी समूहाच्या अदानी एंटरप्राईजेसचा एफपीओची निर्धारीत किंमत, विक्रीची तारीख आणि इतर प्रक्रिया या अहवालाने बाधित होणार नाही, शेअर्स प्राईस बँडमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
बँकर्स, एंकर गुंतवणूकदार, गुंतवणूकदार यांचा कंपनीच्या एफपीओवर पूर्ण विश्वास आहे. एफपीओ जोरदार कामगिरी बजावेल यात तिळमात्र शंका नसल्याचा दावा प्रवक्त्याने केला आहे.
हा अहवाल खोटा आणि फसवणूक करणारा असल्याचा दावा अदानी समूहाने केला आहे. एफपीओला नुकसान पोहचण्यासाठीचा हा अहवाला आणल्याचा आरोप समूहाने केला आहे. अदानी एंटरप्राईजसच्या एफपीओलाही या बातमीने हादरा दिला. शुक्रवारी पहिल्या दिवशी केवळ एक टक्के गुंतवणूकदारांनी त्यामध्ये बोली लावली.
बीएसईवर (BSE) अदानी एंटरप्राईजेसच्या एफपीओवर पहिल्या दिवशी 4.55 कोटी शेअरच्या बदल्यात केवळ 4.7 लाख शेअरसाठीच बोली लावण्यात आली. या आकड्यावरुनच अहवालाच्या त्सुनामीने किती नुकसान केले हे दिसून येते.
या एफपीओसाठी शेअर प्राईस बँड 3,112 ते 3,276 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी हा शेअर बीएसईवर 2,762.15 रुपयांवर बंद झाला. शेअर बाजारात दाखल होण्यापूर्वीच अदानी एंटरप्राईजसने एंकर गुंतवणूकदारांकडून 5,985 कोटी रुपये जमवले आहेत.