नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या साम्राज्याला हिंडनबर्ग रिसर्च फर्मने सुरुंग लावला. या शॉर्ट सेलरच्या एका अहवालाने एका महिन्यात अदानींचे शेअर्स जमिनीवर आलेत. पण संकटातही काहीजण संधी शोधतात. त्यातून बक्कळ नफा कमावितात. अदानी समूहात आता तेजी दिसत असली तरी हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अनेक गुंतवणूकदार अदानींच्या शेअर्सपासून चार हात दूर आहेत. पण या पठ्याने तर अदानींच्या शेअरमधून दोनच दिवसांत कोट्यवधी छापले आहेत. NRI गुंतवणूकदार राजीव जैन यांनी हा करिष्मा केला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये त्यांनी नशीब आजमावले. दोनच दिवसांत अदानींच्या शेअर्समधून 3100 कोटी रुपये छापले.
जैन यांच्या मालकीच्या GQG पार्टनर्सने संकटात फसलेल्या अदानी समूहाच्या शेअरवर 15,446 कोटी रुपयांची पेज लावली. ही मोठी जोखीम होती. पण ती जैन यांनी घेतली. त्याचा त्यांना मोठा फायदा झाला. केवळ दोन दिवसांतच 20 टक्के म्हणजेच 3,100 कोटींचा जोरदार परतावा त्यांना अदानी समूहाने दिला. अर्थात त्यासाठी त्यांचा अभ्यास आणि अंदाज अचूक निघाला. पण फासे पलटले असते तर त्यांची गुंतवणूक अडकून पडली असती. शेवटी रिस्क है तो इश्क है, असे म्हणतात.
अदानी समूहाच्या चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये जैन यांनी गुंतवणूक केली होती. त्यांच्या गुंतवणुकीची मार्केट व्हॅल्यू वाढून ती 18,548 कोटी रुपये झाली. या कंपन्यांमध्ये अदानी इंटरप्राईजेस, अदानी पोर्टस ॲंड स्पेशल इकोनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रांसमिशन यांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 3,102 कोटी रुपयांचा फायदा झाला.
जैन यांनी गुरुवारी अदानी इंटरप्राईजेसचे 1,410.86 रुपयांचे शेअर खरेदी केले होते. त्यानंतर या शेअर्सच्या किंमतीत 33 टक्क्यांची उसळी आली. त्यामुळे निफ्टीमध्ये जैन यांना 1,813 कोटी रुपयांचा फायदा झाला. अदानी समूहाने, अदानी पोर्ट्स ॲंड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ), अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL), अदानी ट्रांसमिशन लिमिटेड (ATL) आणि अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड (AEL) या सूचीबद्ध कंपन्यांतील शेअर बाजारात विक्री केले. जीक्यूजी पार्टनर्स या अमेरिकन कंपनीने हा सौदा केला आहे. ही कंपनी अदानी समूहातील गुंतवणूकदार झाली आहे.
अदानी समूहावर 2.21 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामधील जवळपास 8 टक्के कर्ज पुढील आर्थिक वर्ष संपेपर्यंत चुकते करायचे आहे. विक्रीपूर्वी एईएलमध्ये प्रवर्तकांचा 72.6 टक्के हिस्सा होता. यातील 3.8 कोटी शेअर्स किंवा 3.39 टक्के भागभांडवल 5,460 कोटी रुपयांना विक्री झाले. APSE मध्ये प्रवर्तकांचा 66 टक्के हिस्सा होता आणि त्यांनी 8.8 कोटी समभाग अथवा 4.1 टक्के भागभांडवल 5,282 कोटी रुपयांना विकले.