नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) सध्या गौतम अदानी यांच्या समूहात केलेल्या गुंतवणुकीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. अदानी साम्राज्याला तडे गेले आहेत. संपत्तीचे आकडे दिवसागणिक झरझर खाली उतरत आहेत. एकेकाळी जागतिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अदानी (Gautam Adani) यांना विविध इंडेक्सने टॉप-20 यादीतही बाहेरचा रस्ता दाखविला आहे. घसरलेल्या संपत्तीचा रोज एक आकडा बाहेर येत आहे. एलआयसीने अदानी समूहात (Adani Group) मोठी गुंतवणूक केली आहे. या भयकंपात इतर अनेक मोठ्या खेळाडूंप्रमाणे एलआयसीने ही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पण आता विरोधकांनी (Opposition Leader) झोडून काढल्यानंतर एलआयसी अलर्ट मोडवर आली आहे. पुढील आठवड्यात अदानी समूहासोबत बैठक घेण्याचा निर्णय एलआयसीने घेतला आहे. त्यानंतर एलआयसी गुंतवणुकीविषयीची रणनिती ठरविणार आहे.
CNBC-TV18 ने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, भारताची सर्वात मोठी विमा कंपनी पुढील आठवड्यात अदानी व्यवस्थापनासोबत बैठक घेत आहे. त्यानंतर गुंतवणुकीविषयी काय रणनिती ठरवायची याचा निर्णय होणार आहे. एलआयसी ही दीर्घकालीन गुंतवणूकदार आहे. ही कंपनी गुंतवणुकीचा आढावा घेत राहिल.
हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर गौतम अदानी समूहाशी संबंधित शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये सध्या घसरणीचे सत्र सुरु आहे. या अहवालानंतर एलआयसीने अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत आखडता हात घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. विमा कंपनीने अर्थातच या बातम्यांचे खंडण केले आहे.
यापूर्वी 27 जानेवारी रोजी या घडामोडींबाबत एलआयसीने ट्विट करुन खुलासा केला होता. त्यांची बाजू मांडली होती. अदानी समूहातील कंपन्यांमध्ये इक्विटी आणि बाँडमध्ये एलआयसीने एकूण 36,474.78 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत ही गुंतणूक 35,917.31 कोटी रुपये होती.
हिंडनबर्ग संशोधन अहवालाने अदानी समूहाला जोरदार हादरा दिला. 24 जानेवारी 2023 रोजी हा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला गळकी लागली आहे. ती त्यांना थांबविता येत नाहीये. अदानी वादळाचा फटका एलआयसीला ही बसला आहे.
एलआयसीच्या शेअरवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे. केवळ एका आठवड्यात हा स्टॉक 10 टक्के घसरला आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी, बीएसई निर्देशांकावर शेअरमध्ये थोडीशी वाढ दिसून आली. हा शेअर सध्या 600 रुपयांवर व्यापार करत आहे.
देशातील विरोधक, गुंतवणूकदार यांचा दबाव वाढल्याने एलआयसी अदानी समूहातील गुंतवणुकीचा आढावा घेणार आहे. पुढील आठवड्यात याविषयीची बैठक होणार आहे. त्यानंतर गुंतवणुकीविषयीची रणनिती ठरविण्यात येणार आहे.