अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे (US Federal Reserve) व्याजदराचे (Interest Rates) धोरण, तसेच रशिया-युक्रेन वादामुळे सध्या सोन्याचे दर काही आठवड्यांपासून एका विशिष्ट स्तरावर पोहचले आहेत. फेडरल रिझर्व्हने जेव्हा व्याज दर वाढवण्याचे सुतोवाच केले तेव्हा सोन्याची मागणी कमी होत असते. त्यामुळ साहजिकच सोन्याच्या दरातदेखील घट होत असते. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल सुरु आहे. सध्या सोन्याला मागणी वाढल्याने त्याचे भावदेखील वाढत आहेत. लग्नसराईचे (Wedding) दिवस सुरु आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये सोन्याला ‘सोन्यासारखा भाव’ येणे साहजिकच आहे. त्यामुळे अनेकांसमोर एक प्रश्न निर्माण होत आहे. पुढे भाव वाढण्यापेक्षा आताच आहे त्या दरात सोन्याची खरेदी करावी की, अजून काही काळ वाट पहावी? सोन्याचे दर नेमके कधी खाली येणार?
डोमेस्टिक कमोडिटी मार्केट ‘एमसीएक्स’वर या आठवड्यात सोने 202 रुपयांच्या तेजीसह 52 हजार 99 रुपये प्रतिदहा ग्रॅमपर्यंत पोहचले होते. ऑगस्टमध्ये वितरीत करण्यात येणारे सोने 171 रुपयांच्या तेजीस 52 हजार 338 रुपये प्रतिदहा ग्रॅमपर्यंत पोहचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 10.60 डॉलरच्या वृध्दीसह या आठवड्यात 1948.40 डॉलर प्रतिआउंसला पोहचून बंद झाले. एमसीएक्सवर चांदी 67 हजार 32 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी तेजीसह 24.90 डॉलर प्रतिआउंसवर पोहचली होती.
कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, रशिया-युक्रेनमधील वाद व फेडरल रिझर्वतर्फे व्याजदर वाढीच्या हालचालींमुळे सोन्यामध्ये मोठी चढ-उतार बघायला मिळत आहे. कोरोना आटोक्यात आला असल्याने सध्या लग्नसराईदेखील जोरात सुरु आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याला मागणी वाढल्यामुळे त्याच्या दरातदेखील तेजी दिसून येत आहे. डोमेस्टिक मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये सोने 53 हजार 500 रुपयांच्या पातळीवर आणि मीडिअम टर्ममध्ये 56 हजार रुपये प्रतिदहा ग्रॅमपर्यंत सहज पोहचू शकते. ‘मिंट’च्या एका रिपोर्टमध्ये रेलिगेअर ब्रोकिंगच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेव यांनी सांगितले, की फेडरल रिझर्व्ह पुढील काळात व्याजदरात अर्धा टक्का वाढ करु शकते. या निर्णयामुळे सोन्याच्या किमतींवर काहीसा दबाव वाढू शकतो. वाढत्या महागाईमुळे व्याजदरात वाढ करण्याचा दबाव वाढत आहे.
पुढील काळातील काही राजकीय घडामोडी सोन्याच्या दरवाढीत महत्वाची भूमिका निभावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रशिया-युक्रेन तणाव वाढतच आहे. यातच, जर अमेरिकेसोबत इतर युरोपियन देश रशियावर अजून नवे निर्बंध लादत असतील तर यातून तेलाच्या किंमतीत वाढ होउ शकते. त्यामुळे महागाईत वाढ होउन परिणामी सोन्याच्या दरात अधिकची वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. या आठवड्यात डॉलर इंडेक्स 99.84 च्या पातळीवर बंद झाला होता. दरम्यान, आयआयएफएल सिक्युरिटीचे अनुज गुप्ता यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डसाठी 1950-60 डॉलरवर अडथळा निर्माण झाला आहे. त्याला 1870 डॉलरच्या पातळीवर एक मोठा सपोर्टदेखील मिळण्याची शक्यता आहे. जर हा दर 1960 डॉलरपर्यंत पोहचतो, तर तो कमी कालावधीत सहजच 2 हजार डॉलरच्या पातळीपर्यंत पोहचू शकतो.