नवी दिल्ली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेपूर्वीच आनंदवार्ता आली आहे. सोने-चांदीत कालपासून आपटी बार सुरु आहे. भावात घसरण झाल्याने गुंतवणूकदार, खरेदीदारांची पावले आपोआप बाजाराकडे वळत आहे. गेल्या शनिवारपासून दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यानंतर गुरुवारी सोन्याच्या भावाने मामुली उसळी घेतली. त्यानंतर काल सकाळच्या आणि संध्याकाळच्या सत्रात भावात पुन्हा पडझड झाली. आज सकाळच्या सत्रात सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरल्या आहेत. उद्या, 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे. अनेक जण या दिवशी सोने-चांदीची खरेदी शुभ मानतात. गेल्या पाच वर्षांत सोन्याचा भाव दुप्पट झाला आहे.
आजचा भाव काय
गुडरिटर्न्सनुसार, 21 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची पडझड झाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 56,000 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 230 रुपयांनी घसरला. आज सकाळच्या सत्रात हा भाव 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 14 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने 56,800 तर 24 कॅरेट सोने 61,950 रुपये प्रति तोळा मिळत होते.
चांदीत 2200 रुपयांची घसरण
आज, 21 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 14 एप्रिल रोजी एक किलो चांदीचा भाव 79,600 रुपये होता. आज हा भाव 77,400 झाला. चांदीच्या किंमतीत जवळपास 2200 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्यापेक्षा चांदीने गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. चांदीने जानेवारी ते मार्च महिन्यात 12 टक्के परतावा दिला आहे.
24 कॅरटचे सोने
24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध असते. यामध्ये इतर कोणत्याच धातूचा समावेश नसतो. हे सोन्याचे सर्वात शुद्ध रुप मानण्यात येते. याचा दर्जा आणि गुणवत्तेमुळे या सोन्याची किंमत जास्त असते. 24 कॅरेट सोन्याचा उपयोग सोन्याची शिक्के, तुकडे, बिस्किट तयार करण्यासाठी करतात. तसेच औषध, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सुद्धा याचा वापर करण्यात येतो.
22 कॅरेट सोने
22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. इतर 8.33 टक्के अन्य धातूंचे मिश्रण असते. या धातूंमध्ये प्रामुख्याने चांदी आणि तांब्याचा वापर होतो. 22 कॅरेट सोने पण शुद्ध मानण्यात येते. पण हे सोने 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी शुद्ध असते. सोन्याची दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी याच सोन्याचा अधिक वापर होतो. हे दागिने महत्वाच्या कार्यक्रमात, फंक्शन यासाठीच घालण्यात येतात. हे दागिने वजनाने हलके आणि नरम असतात.
18 कॅरेट सोने
18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के चांदी आणि तांब्याचा वापर करण्यात येतो. 18 कॅरेट सोन्यात इतर धातूंचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने हा धातू कठोर होतो. हे दागिने, आभुषणे, आंगठी, गळ्यातील चैन रोजच्या वापरासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी जे सोन्याचे दागिने तयार होतात, ते शक्यतोवर 18 कॅरेट सोन्याचेच असतात.
14 कॅरेट सोने
14 कॅरेट सोन्यात इतर धातूंची संख्या अधिक असते. यामध्ये केवळ 58.3 टक्के शुद्ध सोने असते. इतर 41.7 टक्के निकेल, चांदी, जस्त या धातूंचे मिश्रण असते.