नवी दिल्ली : विमान इंधनाच्या (ATF) दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा ‘एटीएफच्या’ दरात वाढ करण्यात आली आहे. जेट फ्यूलच्या (Jet fuel) दरात 16.3 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, दर 1.41 लाख रुपये प्रति किलोलीटर वर पोहोचले आहेत. विमान इंधनाच्या भावात होत असलेल्या वाढीचा मोठा फटका हा विमान वाहतूक कंपन्यांना बसत आहे. एटीएफ महागल्याने आता विमान कंपन्या प्रवास भाड्यात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत बोलताना एअरलाइन्सने (Airlines) सांगितले की, एटीएफचे वाढत असलेले मूल्य आणि रुपयामध्ये सुरू असलेली घसरण यामुळे विमान कंपन्यांना दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे भाडेवाढ केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता विमान कंपन्यांसमोर नाही. त्यामुळे आता लवकरच विमान कंपन्या प्रवासी भाड्यामध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ करू शकतात असा अंदाज बांधला जात आहे. देशात आधीच महागाईचा भडका उडाला आहे. सर्व वस्तुंचे आणि सेवांचे दर गगनाला भिडले आहेत. विमान प्रवासाच्या भाड्यात देखील वाढ झाल्यास ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे.
स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंह यांनी याबाबत बोलताना सांगितले की, गेल्या वर्षभरात जेट फ्यूलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महाग जेट फ्यूलचा मोठा फटका हा विमान कंपन्यांना बसत आहे. मार्जीनमध्ये देखील मोठी घट झाली आहे. त्यामुळे विमानाच्या भाड्यात दहा ते पंधरा टक्के वाढ करणे आवश्यक बनले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 2021 पासून ते आतापर्यंत विमानाच्या इंधनामध्ये जवळपास 120 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मात्र त्यातलुनेत भाडेवाढ करण्यात आली नाही. केंद्र सरकारने जेट फ्यूलवर आकारण्यात येणारा कर कमी करून विमान कंपन्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यात देखील एटीएफमध्ये वाढ झाली, मात्र आम्ही त्यावेळी भाड्यात कोणतीही वाढ केली नाही. मात्र आता भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.
जेट फ्यूलच्या दरात वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा जेट फ्यूलचे दर वाढवण्यात आले आहेत. एटीएफच्या दरात 16.3 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आता एटीएफचे दर हे 1.41 लाख रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एटीएफच्या भावात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यात एटीएफचे दर 91 टक्क्यांनी वाढले आहेत. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात एटीएफचे दर 72,062 रुपये प्रति किलोलीटर इतके होते. आज ते 1.41 लाख रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचले आहेत. विमान इंधनात सुरू असलेल्या दरवाढीचा मोठा फटका हा विमान कंपन्यांना बसत आहे.