नवी दिल्ली | 6 February 2024 : रतन टाटा यांच्या आयटी क्षेत्रातील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजने (TCS) बाजारात एक चमत्कार घडवला. या कंपनीचा शेअर रेकॉर्डस्तरावर पोहचला. या कंपनीने केवळ 35 मिनिटात जवळपास 60 हजार कोटींची कमाई केली. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 15 लाख कोटींपेक्षा अधिक झाले. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा कंपनीचे मूल्य 15 लाख कोटींच्या पुढे गेले. या 10 महिन्यात कंपनीचा शेअर जवळपास 35 टक्क्यांनी वधारला. कंपनीने अनेक दिवसानंतर रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळाली.
कंपनीच्या शेअरचा रेकॉर्डब्रेक
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेजचा शेअर मंगळवारी शेअर बाजारात रेकॉर्ड स्तरावर पोहचला. बीएसईच्या आकड्यांनुसार, कंपनीचा शेअर 9 वाजून 50 मिनिटांनी म्हणजे 35 मिनिटांच्या सत्रात 4.10 टक्क्यांच्या तेजीसह 4135.90 रुपयांवर पोहचला. त्याने आणखी एक रेकॉर्ड नावावर नोंदवला.
ओलांडला चार हजारांचा टप्पा
कंपनीच्या शेअरने जवळपास एका वर्षात 4000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये 3.83 टक्के म्हणजे 152 रुपयांची तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर 4125 रुपयांवर व्यापार करत आहे. कंपनीचा शेअर 4 हजार रुपयांवर उघडला होता. एक दिवसापूर्वी कंपनीचा शेअर मामूली तेजीसह 3972.75 रुपयांवर बंद झाला होता.
35 मिनिटात कमावले 60 हजार कोटी
तेजीच्या सत्रामुळे कंपनीच्या मूल्यात जवळपास 60 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. कंपनीचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचल्यावर मार्केट कॅप 5.13 लाख कोटी रुपयांवर पोहचले. तर एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 14,53,649.63 कोटी रुपयांवर पोहचले. म्हणजे 35 मिनिटांमध्ये कंपनीने 60 हजार कोटी रुपयांची कमाई केली. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 15,09,322.10 कोटी रुपयांवर पोहचले आहे.
पहिल्यांदाच 15 लाख कोटींना गवसणी
कंपनीचे मार्केट कॅप पहिल्यांदाच 15 लाख कोटींच्या पुढे गेले. हा टप्पा पार करणारी ही देशातील दुसरी मोठी कंपनी ठरली आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने हा कारनामा करुन दाखवला आहे. टाटा समूहातील अनेक कंपन्यांनी विक्रमाची नोंद केली आहे. टाटा मोटर्स आणि टायटनवर गुंतवणूकदार फिदा आहेत. टीसीएस पण त्यात अग्रेसर आहे. त्यांना मोठा फायदा झाला आहे.