नवी दिल्ली | 25 February 2024 : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. एक महिन्यात अयोध्या राम मंदिरात 25 कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा होत असल्याने भारतीय स्टेट बँकेने त्याच्या व्यवस्थापनासाठी चार ऑटोमॅटिक हाय टेक्निक काऊटिंग मशीन बसविण्यात आले आहे. राम ट्रस्टचे अधिकारी प्रकाश गुप्ता यांनी ही माहिती दिली. रामनवमीच्या काळात अयोध्येत मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येण्याची शक्यता आहे. या काळात 50 लाख भक्त अयोध्येत उपस्थित असण्याचा अंदाज आहे.
25 किलो सोने आणि चांदी दान
प्रकाश गुप्ता यांनी या दानधर्माविषयी माहिती दिली. त्यानुसार, 25 किलो सोने आणि चांदीचे आभूषण, दागिने, धनादेश, ड्राफ्ट आणि रोखीचा यामध्ये समावेश आहे. ट्रस्टच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने थेट किती रक्कम जमा झाली, याची माहिती समोर आलेली नाही. राम भक्त चांदी आणि सोन्याच्या वस्तू दान करत आहेत. यातील काही वस्तूंचा राम मंदिरात उपयोग करण्यात येऊ शकत नाहीत. तरीही भक्तांचा उत्साह आणि भक्तीभाव पाहता मंदिर सोने आणि चांदीचे साहित्य, दागिने, भांडी दान स्वरुपात स्वीकारत आहेत. 23 जानेवारी ते आतापर्यंत 60 लाखाहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे.
काऊटिंग रुमच तयार करणार
राम मंदिर ट्रस्ट रामनवमी उत्सवासाठी आतापासूनच तयारीला लागली आहे. रामनवमी एप्रिल महिन्यात आहे. त्यावेळी जवळपास 50 लाख भक्त रामलल्लाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भक्तांन दानाची पोच पावती मिळावी यासाठी एक डझन कम्प्युटराईड काऊंटर तयार करण्यात आले आहेत. तर मंदिर परिसरात अतिरिक्त दान पेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता रोख रक्कम, दानात येणाऱ्या वस्तूंची मोजदाद करण्यासाठी एक सुसज्ज काऊटिंग रुम तयार करण्यात येणार आहे.
सोने-चांदी सरकार दरबारी
राम मंदिरात दान स्वरुपात मिळणारे सोने, चांदी आणि इतर किंमती भेटवस्तू वितळण्यासाठी आणि त्यांच्या देखरखीसाठी ते भारत सरकारकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी ही माहिती दिली. या दानासंदर्भात आता एसबीआयशी एक करार पण करण्यात आला आहे. त्यानुसार, दान, चेक, ड्राफ्ट आणि रोख रक्कम जमा करणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी एसबीआयवर आहे. सध्या दोन वेळा या दानधर्माची संपूर्ण माहिती ठेवण्यात येत आहे.