नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : लहान मुलांची त्वचा मृदू, मुलायम असते. ती अत्यंत नाजूक असते. मुलांना घामोळ्यापासून वाचविण्यासाठी अनेक पालक मुलांसाठी बाजारातील बेबी टॅल्कम पावडर (Baby Powder Company) आणतात. बाजारात नावजलेल्या कंपन्यांचे अनेक ब्रँड्स लहान मुलांची पावडर विक्री करतात. पण या उत्पादनांचा इतका भयंकर आणि वाईट परिणाम तुमच्या शीशूवर होत असेल, याची पुसटशी कल्पना पण तुम्हाला येणार नाही. दरम्यान एका नावजलेल्या बेबी पावडर कंपनीला कोर्टाने दणका दिला. 154 कोटींचा दंड (Penalty) ठोठावला. या कंपनीच्या उत्पादनामुळे कॅन्सरचा (Cancer) धोका होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांनी पण या कंपनीच्या उत्पादनाबाबत शंका घेतली होती. या कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात कंपनीने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. कोणती आहे ही कंपनी, काय आहे आताचे प्रकरण
कोणती आहे ही कंपनी
जागतिक ब्रँड असलेली कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन संदर्भातील हे प्रकरण आहे. ही कंपनी लहान मुलांसाठी टॉल्कम पावडर तयार करते. हा ब्रँड जगभर लोकप्रिय आहे. पण एका प्रकरणात अमेरिकन कोर्टाने या कंपनीला 154 कोटींचा दंड ठोठावला आहे. एका व्यक्तीने या कंपनीच्या उत्पादनामुळे कॅन्सर झाल्याचा आरोप लावला होता. या कंपनीच्या बेबी पावडरमुळे कॅन्सरचा धोका झाल्याचा आरोप करण्यात येत होता.
काय आहे प्रकरण
हे प्रकरण अमेरिकेतील आहे. एंथोनी हर्नांडेज वॅलाडेज या व्यक्तीने या कंपनीला न्यायालयात खेचले होते. या व्यक्तीच्या दाव्यानुसार, तो लहानपणापासूनच या कंपनीचे बेबी पावडर वापरत होता. पण नंतर त्याला कँन्सर झाला. हा कॅन्सर या टॅल्कम पावडरमुळे झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. दीर्घ काळासाठी ही पावडर वापरल्याने त्याच्या छातीजवळ मेसोथेलियोमा नावाचा कॅन्सर झाल्याचे म्हणणे त्याने कोर्टासमोर मांडले.
कंपनीचे स्पष्टीकरण
कंपनीने कोर्टासमोर बाजू मांडली. त्यानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे उत्पादन पूर्णपणे सुरक्षित आहे. ही टॉल्कम पावडर एका विशेष पांढऱ्या रंगाच्या डब्यात हवाबंद करत विक्री करण्यात येते. उत्पादन सुरक्षित आणि वापरण्यास योग्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या खटल्यात कायदेशीर शुल्क आणि इतर खर्चापासून वाचण्यासाठी कंपनीने समेट घडवून आणण्याची तयारी सुरु केली आहे.
यापूर्वीपण दंड ठोठावला
यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन प्रोडक्ट्स बाबत आरोप लावण्यात आलेले आहे. भारतात महाराष्ट्रासह काही राज्यांनी कंपनीला उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले होते. काही सॅम्पल मानवी शरीराला हानीकारक असल्याचा त्यावेळी आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी कंपनीने विक्रीत घसरण होत असल्याचा बनाव करत बाजारातून उत्पादने हटवली होती.
दोन वर्षांपासून लढा
एंथोनी हर्नांडेज वॅलाडेज हा कंपनीविरोधात गेल्या दोन वर्षांपासून लढा देत आहे. त्याने त्यासाठी अनेक पुरावे पण सादर केले. सुनावणीअंती कोर्टाने कंपनीला 154 कोटींचा दंड ठोठावला. ही रक्कम पीडित व्यक्तीला, याचिकाकर्त्याला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.