LIC HFL Home Loan | देशातील दोन गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी(Housing Finance Complies) सोमवारी, 22 ऑगस्ट रोजी कर्जदरात वाढवले. बजाज हाउसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance Company)आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance Company) या दोन वित्तीय कंपन्यांनी ही वाढ केली आहे. या दोन्ही कंपन्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण त्या कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. पण दोन्ही कंपन्यांनी कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. कर्जावरील व्याज दर वाढल्याने ग्राहकांचा हप्ता वाढणार आहे. त्यांना पूर्वीपेक्षा जादा ईएमआय (EMI) भरावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच, रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केली आहे. त्यानंतर बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या त्यांचे कर्जदर वाढवत आहेत. नुकत्याच झालेल्या दरवाढीमध्ये रिझर्व्ह बँकेने कर्जदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. त्याआधी दोन वेळा 90 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली होती.
सध्या सर्वच बँकांनी व्याजदर वृद्धीचा सपाटा लावला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि बजाज हाऊसिंग फायनान्सने हाच मार्ग निवडला आहे. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत रेपो दरात 140 बेसिस पॉइंट्स किंवा 1.40 टक्के वाढ केली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दरात वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदर वाढले आहेत. यानंतर बँका आणि फायनान्स कंपन्यांनी आपली कर्जे महाग केली आहेत. मे महिन्यानंतर सातत्याने ही वाढ होत असून त्यामुळे गृहकर्ज महाग झाले आहेत. परंतू, मुदत ठेव, आवर्ती मुदत ठेव आणि बचत खात्यांवर अधिकचे व्याज ग्राहकांना मिळत आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्सने गृहकर्जावर 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. आता पगारदार आणि व्यावसायिकांना किमान 7.70 टक्के दराने कर्ज मिळणार आहे. पूर्वी हा दर 7.20 टक्के होता. या दरवाढीनंतर ही बाजारातील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आकर्षक दरावर कर्ज पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीने केला आहे.
तर, एलआयसी हाउसिंग फायनान्सनेही कर्जदरात वाढ केली आहे. या कंपनीने प्राइम लेंडिंग रेट LHPLR 0.50 टक्क्यांनी वाढवला आहे. आता LIC हाऊसिंग फायनान्सचे गृहकर्ज 8 टक्के दराने मिळेल. पूर्वी गृहकर्जाचा दर 7.50 टक्के होता. मात्र आता ग्राहकांना 8 टक्के व्याज मोजावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणानंतर आणि रेपो दरात वाढीच्या निर्णयानंतर गृहकर्जाच्या मासिक हप्त्यांत वाढ झाली आहे. तरीही देशातील घरांची वाढती मागणी कायम राहिल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.