Credit Debit Card Theft | क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवल्यास काय करावे? सोप्या पाच स्टेप्स

| Updated on: Nov 02, 2020 | 3:40 PM

मोठा फटका टाळण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड गहाळ झाल्यानंतर काही महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे

Credit Debit Card Theft | क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवल्यास काय करावे? सोप्या पाच स्टेप्स
Follow us on

मुंबई : डिजिटल अर्थात कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे अनेक जण क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या (Credit-Debit Card) मदतीने व्यवहार करतात. हे व्यवहार सुरक्षित असले, तरी लहानसा निष्काळजीपणाही मोठा आर्थिक भुर्दंड पडण्यास कारणीभूत ठरु शकतो. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवले अथवा चोरीला गेले, तर अनेकांना घाबरुनच काही सुचेनासे होते. मात्र मोठा फटका टाळण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड गहाळ झाल्यानंतर काही महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. (Bank Credit Card Debit Card Lost or Stolen take five steps immediately)

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवण्याची वेळ कोणावर येऊ नये, मात्र तशी परिस्थिती उद्भवल्यास काय करावे, याची माहिती सर्वांनी आधीपासूनच घेऊन ठेवणे गरजेचे आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवल्यानंतर सर्वात आधी बँकेला रिपोर्ट करा

1. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेला सूचना द्या

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवल्यानंतर संबंधित बँकेला तात्काळ सूचना देणे गरजेचे आहे. बँकेला फोन करुन कार्ड ब्लॉक करण्यास सांगा. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये बँकेचा कस्टमर केअर क्रमांक सेव्ह करुन ठेवा. जेणेकरुन नंबर शोधण्यात तुमचा वेळ वाया जाणार नाही. याशिवाय ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष ब्रांचमध्ये जाऊनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

2. बँक एक्झिक्युटिव्हच्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या

तुमची ओळख पटवण्यासाठी फोनवरुन बँकेचे एक्झिक्युटिव्ह काही प्रश्न विचारतील. जसे तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, आई-वडिलांचे नाव, शेवटचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड कधी वापरले होते, याची माहिती.

3. पोलिस स्थानकात तक्रार नोंदवा

बँकेच्या कस्टमर केअरला तुमची ओळख पटल्यानंतर कार्ड ब्लॉक होईल. मात्र अतिरिक्त खबरदारी म्हणून तुम्ही जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार नोंदवा. एफआयआरची एक प्रत तुमच्या बँकेच्या शाखेलाही पाठवा

4. क्रेडिट कार्डाचा विमा

क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर कार्ड विमा तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. कार्ड हरवल्याची सूचना बँकेला दिल्यानंतरही कुठला गैरव्यवहार झाला, तर त्याची जबाबदारी तुमची नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही कार्ड इन्शुरन्स कंपनीला माहिती द्या. मात्र बँकेला रिपोर्ट करण्याआधीच्या काळात चोराने कुठला व्यवहार केला असेल, तर त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेणार नाही. (Bank Credit Card Debit Card Lost or Stolen take five steps immediately)

5….तर कार्डावरुन व्यवहार करण्यास थांबा

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चोरीला गेल्याच्या समजातून तुम्ही बँकेला रिपोर्ट केले आणि तेवढ्यात तुम्हाला तुमचे हरवलेले कार्ड सापडले, तरी त्यावरुन तात्काळ कोणताही व्यवहार करु नका.

(Bank Credit Card Debit Card Lost or Stolen take five steps immediately)