नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Employees) काही महत्वपूर्ण मागण्यांसाठी संपाचे हत्यार (Bank Strike) उपसले आहे. त्याचा परिणाम बँकांच्या कामकाजावर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेत काही महत्वाचे काम असल्यास ते उद्या उरकून घ्या. नाहीतर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. कारण या कामासाठी तुम्हाला दोन दिवस वाट पहावी लागू शकते.
19 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. उद्याचाच दिवस त्यासाठी आडवा आहे. या दिवशी शनिवार आहे आणि त्यानंतर रविवार असल्याने दोन दिवस बँकेचे कामकाज खोळंबणार आहे.
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने (AIBEA) देशभरात संप (Bank Strike) पुकारला आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी देशातील बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो.
देशात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँकांचे कामकाज सुरु असते. परवा म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी तिसरा शनिवार आहे. कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याने या दिवशी देशभरातील बँकांचे कामकाज प्रभावित होणार आहे
बँक ऑफ बडोदाने (BoB) संपाबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या महासचिवाने संपाची नोटीस पाठवली आहे. संघटनेचे सदस्य 19 नोव्हेंबर रोजी संपावर जात असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हा संप एक दिवसाचा असेल. त्यामुळे मुख्य शाखांसह ग्रामीण भागातील शाखांवरही या संपाचा प्रभाव दिसून येईल. तरीही बँका ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी काही उपाय करतात का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
19 नोव्हेंबर रोजीच्या संपामुळे ATM सेवाही प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित काही कामकाज करायचे असेल तर या दिवशीपूर्वीच ते उरकून घ्या. त्यामुळे कामात अडथळा येणार नाहीत.
बँक कर्मचाऱ्यांवर सातत्याने होणारे हल्ले, पदाधिकाऱ्यांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मनाविरुद्ध बदल्या होत असल्याचे प्रकारही वाढले आहेत. याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे. AIBEA चे महासचिव सी एच वेंकटाचलम यांनी काही दिवसांपूर्वी याविषयी आवाज उठविला होता.