नवी दिल्ली : तामिळनाडू येथील कंपनी श्री रोंगा पॉलिमर आणि इकोलाईन बाप-लेकाची जोडी चालवते. या कंपनीने प्लास्टिक कचरा जमा करून त्यापासून कपडे तयार करण्याचे काम सुरू केले. हळूहळू हा फार्म्यूला सुपरहीट झाला. यांची कंपनी पीईटी प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करून त्यापासून जॅकेट, टी शर्ट, ब्लेझर सह अन्य कपड्यांचे उत्पादन करते. अशी ही ब्रँड स्टोरी आहे.
शंकर आणि त्यांचा मुलगा सेंथील शंकर यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून इको फ्रेण्डली कपडे तयार करून सर्वांना आश्चर्यचकीत केले. परंतु, ज्या रस्त्याने ते जात होते तो तेवढा सोपा नव्हता. यासाठी बाप-लेकांना मोठा संघर्ष करावा लागला.
शंकर यांनी सांगितलं की, त्यांनी विदेशात तीन दशकं घालवली. त्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये त्यांनी श्री रेंगा पॉलिमर कंपनीची स्थापना केली. ही कंपनी पीईटी भारतात बॉटल रिसायकल करते. त्यापासून टिकाऊ कपडे तयार करते. या कंपनीची वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपये आहे. कंपनी आपले उत्पादन मजबूत बनवण्यासाठी जर्मन टेक्नॉलॉजीचा उपयोग करते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये या कंपनीने तयार केलेले जॅकेट वापरले. तेव्हापासून ही कंपनी प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हिरोशिमा येथे झालेल्या जी – ७ शिखर संमेलनात इकोलाईनचे जॅकेट वापरले. यासंदर्भात सेंथिल यांनी एका वेबसाईटशी संवाद साधला.
सेंथिल म्हणाले, खराब झालेली प्लास्टिक बॉटलपासून सुंदर कपडे तयार करण्याचं स्वप्न होतं. त्याला आम्ही पूर्ण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ही गोष्ट लक्षात आली. आम्ही स्वप्नातही पाहीलं नव्हतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही तयार केलेले कपडे परिधान करतील. मोदी यांच्यामुळे करूरसारखी छोटं ठिकाण जगाच्या नकाशावर आले.