तुम्ही जर आता मित्रांसोबत पार्टी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर जरा थांबा, कारण आता मित्रांसोबत पार्टी करणे महागात पडू शकते, या पार्टीचा मोठा आर्थिक फटका तुमच्या खिशाला बसू शकतो. अर्थात या पार्टीमध्ये बियरचा समावेश असेल तर. कारण आता लवकरच बीयर कंपन्या आपल्या बीयरचे दर वाढवणार (Beer Price Hike) आहेत. विविध कंपन्यांच्या बीयरच्या (Beer) दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते, तसे संकेत कंपन्यांच्या वतीने देण्यात आले आहेत. उन्हाळ्यात बीयरची सर्वाधिक विक्री होते. मार्च ते जूनदरम्यान 40 ते 50 टक्के बीयरच्या साठ्याची विक्री होतो. मात्र यंदा उन्हाळा सुरू होऊन बीयर विक्रीचा हंगाम सुरू झाला तरी देखील बीयर उद्योजग म्हणावे तसे आनंदीत दिसत नाहीयेत. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Ukraine Crisis) हे आहे. बीयरच्या निर्मितीसाठी गव्हाची मोठ्याप्रमाणात आवश्यकता असते, युक्रेन आणि रशिया हे दोनही देश गव्हाची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मात्र युद्ध सुरू असल्यामुळे निर्यातीवर बंधने आली आहेत, निर्यात ठप्प असल्याने त्याचा परिणाम हा बीयर उद्योगावर झाला आहे.
बीयरचे दर का वाढणार याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध हे आहे. रशिया आणि युक्रेन या दोनही देशांचा समावेश हा प्रमुख गहू उत्पादक देशांमध्ये होतो. जवळपास जागतिक स्थरावर 30 टक्के गव्हाची निर्यात हे दोन देश करतात. मात्र युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. रशिया आणि युक्रेनकडून ज्या देशांना गव्हाचा पुरवठा होत होता, तो आता बंद झाला आहे. परिणामी भारतीय गव्हाला आंतरराष्ट्रीय स्थरावर मागणी वाढल्याने भारतात गव्हाचे भाव वाढले आहेत. बीयर निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा गहू असतो आता गहू महागल्यामुळे बीयरचे दर देखील वाढवावे लागणार असल्याचे बीयर उत्पादकांनी सांगितले.
गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बीयर उदयोग संकटात सापडला. लॉकडाऊनचा मोठा फटका हा बीयर उद्योगाला बसला. तर दुसरीकडे कोरोनाचे संकट नुकतेच कमी होऊन पुन्हा एकदा उद्योग पटरीवर येताना दिसत होता, तोच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. गेल्या दीड महिन्यापासून हे युद्ध सुरू असून याचा मोठा फटका हा बीयर उद्योगाला बसत आहे.