नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. प्रत्येक नवीन शोधामागे माणसाला येणाऱ्या अडचणींचा अंतर्भाव असतो. आपले रोजचं जगणं कसे सुसह्य होईल यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. यातून आपल्या रोजच्या समस्येवर उत्तरं मिळत जातात. लोकांना त्यांना आलेल्या अडचणीतून मार्ग काढताना नव्या संकल्पना सुचल्याने ते आज यशस्वी झाले आहेत. एका तरुण उद्योजकाला त्याचं बिझनेस मॉडेल तो टॅक्सीतून प्रवास करताना टॅक्सी चालकाने जादा भाडे मागितल्याने सुचले होते. त्यातून मग त्याने मोठी कंपनी उभी केली आहे जिची चर्चा आपण ऐकत असतो.
आपण ओला कॅब या खाजगी टॅक्सी कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याबद्दल बोलत आहोत. भाविश याने साल 2010 मध्ये त्याचा मित्र अंकीत भाटी याच्या सोबत ओलाची स्थापना केली. या कंपनीचे श्रेय त्याला आलेल्या टॅक्सी चालकाच्या वाईट अनुभवाला द्यायला हवे. त्यातून त्याला अशा प्रकारची त्वरीत मोबाईलद्वारे बुक करता येणारी आरामदायी टॅक्सी सेवा सुरु करण्याची आयडीया सुचली.
भाविश अग्रवाल याला टॅक्सी सेवेचा अनुभव वाईट आल्यानंतर देशात एका चांगल्या टॅक्सी सेवेची गरज असल्याचे वाटले. तिचे भाडे वाजवी असावे आणि चालकांवर जबाबदारी असावी अशी कंपनी त्यांनी सुरु केली. भाविश यांच्या करीयरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमधून झाली होती. दोन वर्षे त्यांनी तेथे काम केले. भाविशने जेव्हा या बिझनेस आयडीयाबद्दल कुटुंबियांना आणि मित्रांना सांगितलं तेव्हा त्याची खिल्ली उडविली गेली. घरातल्यांना ट्रॅव्हल एजन्सी उघडतोय. पवईतील आपल्या वन बीएचके फ्लॅटमध्ये त्याने ओला कॅबचं ऑफीस सुरु केले.
भाविश अग्रवाल याचं शिक्षण आयआयटी मुंबईतून झाले आहे. साल 2004 त्यांनी तेथे प्रवेश केला. त्यांनी कंप्युटर सायन्समध्ये बीटेक डीग्री घेतली आहे. पहिल्या प्रयत्नात आयआयटीत त्यांची निवड झाली नाही. प्रवेश परीक्षेत अपयश आल्याने ते कोटा येथे तयारीसाठी गेले. एक वर्षानंतर त्यांना 23 वे स्थान मिळाले.
मिडीयाच्या वृत्तानूसार ओला कॅब कंपनीचे बाजार मुल्य 4.8 अब्ज डॉलर म्हणजेच 39832 कोटी रुपये इतके आहे. भाविश यांनी साल 2017 मध्ये ओला इलेक्ट्रीक नावाने आणखी एक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी इलेक्ट्रीक दुचाकीची निर्मिती करते. गेल्यावर्षी त्यांनी 2400 कोटीची कमाई केली होती.