नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्स लिमिटेडचे (Tata Steel Long Products Ltd) घोडे एकदाचे गंगेत नहाले. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने कंपनीच्या विलिनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे ही कंपनी टाटा स्टील लिमिटेडमध्ये विलीन होईल. इतकेच नाही तर टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्स लिमिटेडच्या इतर सहा उपकंपन्या पण टाटा स्टील लिमिटेडमध्ये विलीन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व घडामोडींची माहिती शेअर बाजाराला कळविण्यात आली आहे. NCLT च्या कटक येथील खंडपीठाने या विलिनीकरणाला नुकतीच मंजूरी दिली. त्यामुळे टाटा स्टीलच्या शेअरमध्ये उसळी येण्याची शक्यता आहे.
या कंपन्यांचे विलिनीकरण
यापूर्वी टाटा स्टीलचे सीईओ आणि एमडी टी व्ही नरेंद्रन (T V Narendran) यांनी या घाडमोडींबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, उपकंपन्यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया याच आर्थिक वर्षात 2023-24 पूर्ण होईल. टाटा स्टीलमध्ये विलय होणाऱ्या कंपन्यांमध्ये सात कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये में टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्स, द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, टाटा मेटालिक्स, टीआरएफ, इंडियन स्टील अँड वायर प्रोडक्ट्स, टाटा स्टील मायनिंग, एस अँड टी मायनिंग कंपनी यांचा समावेश आहे.
TPVSL मध्ये 26 टक्के वाटा खरेदी करणार
तर टाटा स्टील, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचे एक युनीट वर्धमान सूर्या लिमिटेडमध्ये (TPVSL) 26 टक्के वाटा खरेदी करणार आहे. अजून कंपनीकडून या कराराची माहिती समोर आली नाही. त्यासाठी किती रुपये मोजले याची माहिती देण्यात आली नाही. टाटा स्टील, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीकडून 379 मेगावॅट अक्षय ऊर्जा पण खरेदी करणार आहे.
शून्य कार्बन उत्सर्जन
टाटा स्टीलचे सीईओ आणि एमडी टी व्ही नरेंद्रन यांनी अक्षय ऊर्जाबाबत माहिती दिली. त्यानुसार टाटा पॉवर रिन्यूएबलसोबत त्यांचा वाटा वाढवणार आहे. 2045 पर्यंत टाटा स्टीलने शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. हरित ऊर्जेवर, अक्षय ऊर्जेवर आता अधिक भर देण्यात येणार आहे. त्यासाठी ही घडामोड पथ्यावर पडेल. याचा परिणाम शेअर बाजारात दिसू शकतो.