भाजीपाला (vegetables) आणि इंधनानं (Fuel) किचनचं बजेट बिघडलेलं असताना आता यात डाळींची भर पडलीये. जुलै महिन्यात देशातील बहुतांश शहरात डाळी महाग (inflation) झाल्यात. तूर डाळीच्या किंमती 4 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढल्यात तर उडीद डाळीच्या किंमतीही तीन ते तेरा टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशात डाळींचं रेकॉर्डब्रेक उत्पादन आणि डाळींची आयात नगण्य असतानाही डाळी महाग होतायेत. 2021-22 दरम्यान देशात 277 लाख 5 हजार टन डाळींचं उत्पादन झालंय. हे उत्पादन आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे. 2020-21 च्या तुलनेत जवळपास 23 लाख टनांहून अधिक डाळींचं उत्पादन जास्त झालंय.हमीभाव वाढवल्यानं शेतकरीही डाळवर्गीय पीक लागवडीकडे वळालाय. त्यामुळे खरिपात डाळींचा पेरा गेल्यावर्षी पेक्षा वाढलाय. या वाढलेल्या पेऱ्यामुळे डाळींचं उत्पादनही वाढणार आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 22 जुलैपर्यंत देशात 90 लाख 69 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड झालीये, गेल्या वर्षी डाळीची लागवड 85 लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. असे असून देखील डाळीचे भाव वाढतच आहेत.
मुळात गेल्या काही वर्षांपासून भारतातून डाळींची निर्यात सतत वाढत आहे आणि या वाढलेल्या निर्यातीमुळेच देशांतर्गत पुरवठा मर्यादित राहतोय. 2021-22 या आर्थिक वर्षात भारतातून उच्चांकी चार लाख एक हजार टन डाळींची निर्यात झालीये आणि यंदा डाळींच्या निर्यातीचा वेग गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे.यावर्षी एप्रिल आणि मे दरम्यान सुमारे एक लाख 90 हजार टन डाळींची निर्यात झालीये. गेल्यावर्षीच्या याच काळातील निर्यातीपेक्षा ही निर्यात जवळपास पाचपट अधिक आहे. गेल्या वर्षी एप्रिल आणि मे दरम्यान फक्त 36 हजार 829 टन डाळींची निर्यात झाली होती. वाढलेल्या निर्यातीमुळे डाळींच्या किंमती वाढल्यानं किचनचं बजेट कोलमडलंय. आता सप्टेंबर महिन्यात पिक कापणीनंतर बाजारात नव्या डाळींची आवक वाढल्यानंतरच किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
एकीकडे दाळीचे भाव वाढले आहेत, मात्र दुसरीकडे काहीप्रमाणात खाद्यतेलाचे दर स्वस्त झाल्याने ग्राहकांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. रशिया, युक्रेन युद्ध आणि इंडोनेशियाकडून बंद करण्यात आलेल्या पाम ऑईल निर्यातीच्या पार्श्वभूमीवर भारतात खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता इंडोनेशियाने बंदी उठवली आहे, तसेच भारताने देखील आयात शुल्क कमी केल्याने खाद्यलेलाचे दर स्वस्त झाले आहेत.