नवी दिल्ली : जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा मोठा उलटफेर झाला. हिंडनबर्ग अहवालानंतर टॉप-5 मधील गौतम अदानी (Gautam Adani) टॉप-30 तूनही बाहेर फेकले गेले होते. त्यानंतर मध्यंतरी त्यांच्यावरील मळभ कमी झाल्यावर त्यांचा आलेख उंचावला. आता अनेक प्रकरणात त्यांना दिलासा मिळाल्याने आणि शेअर बाजारात काही शेअर्सनी जोरदार कामगिरी बजावल्याने अदानी यांनी यादीत मोठी झेप घेतली. तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स समूहाचे संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीत मागे पडले. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांना पिछाडीवर टाकले. झुकेरबर्ग यादीत 12 व्या स्थानावरुन 10 व्या स्थानावर पोहचले आहेत.
गौतम अदानी टॉप 20 मध्ये
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात अदानी हे पिछाडीवर गेले होते. आता ते टॉप 20 मध्ये सहभागी झाले आहेत. अदानी समूहाचे मालक यांची एकूण संपत्ती आता 62.9 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत त्यांनी 18 व्या क्रमांकांवर झेप घेतली आहे. गेल्या 24 तासांत अदानी यांच्या संपत्तीत 438 दशलक्ष डॉलरची भर पडली आहे. तर फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलिनिअर इंडेक्समध्ये गौतम अदानी आता 24 व्या क्रमांकावर आले आहेत.
गौतम अदानी यांची संपत्तीत वाढ
गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी आली आहे. अदानी विल्मर, पॉवर आणि ट्रान्समिशनच्या शेअरने जोरदार उसळी घेतली आहे. अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ दिसून आली.
12 लाख कोटींचा फटका
अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाची पोलखोल करण्याचा दावा केला होता. या फर्मच्या अहवालानंतर भारतासह जगात खळबळ माजली होती. अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळले होते. पण तरीही समूहाच्या सर्व शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरु झाले होते. या सर्व घडामोडीत अदानी समूहाचे मार्केट कॅप 12 लाख कोटींनी घसरले.
सुप्रीम दिलासा
सुप्रीम कोर्टाच्या विशेष समितीच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला होता. समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर तुफान तेजीत आहे. सोमवार आणि आज मंगळवारी तेजीचे सत्र कायम होते. काल पण हे शेअर 19 टक्क्यांनी वधारले. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीने अदानी समूहाच्या शेअरमधील भावात कोणतीच गडबडी नसल्याचा अहवाल दिला होता. याविषयीचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. सेबीच्या (SEBI) तपासातही काहीच हाती लागले नसल्याचे समोर आले आहे.
मुकेश अंबानी यांची संपत्ती किती
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर यादीत, मुकेश अंबांनी श्रीमंतांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 93.1 अब्ज डॉलर इतका आहे. तर ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये अंबानी यांच्याकडे 86.1 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर मार्क झुकेरबर्ग यादीत ते 10 व्या स्थानावर आहेत. तर फोर्ब्सच्या यादीत ते 12 व्या स्थानी आहेत.