बाजाार समितीमध्ये नवीन कापूस (Cotton) येण्यास आणखी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. तरीही कापसाचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना (farmer) कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महागाईमुळे (inflation) सूत आणि कापड गिरण्यांचं काय होणार? महाग कापसामुळे कापड उद्योग अडचणीत आलाय.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस खरेदीच्या दरात तब्बल 61 टक्के वाढ झालीये.परदेशात कापसाचे भाव गगनाला भिडलेत. यामुळे आयातीची शक्यताही मावळलीये. यातच कापसाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या अमेरिकेत कापसाचे उत्पादन 28 टक्क्यानं घटन्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानुसार 35 टक्के पिकाची परिस्थिती खूप खराब आहे. त्यामुळे अमेरिकेत कापसाचं उत्पादन घटून 27 लाख टन राहू शकतं. गेल्या वर्षी अमेरिकेत 38 लाख टनांहून अधिक जास्त कापसाचं उत्पादन झालं होतं. अमेरिकेत कापसाचं उत्पादन घटल्यास त्याचा फटका हा निर्यातीला देखील बसणार आहे.
कापसाचे नवीन पिक येण्यास अद्याप बराच वेळ आहे. कापसाचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढतं उत्पादन आणि मर्यादित पुरवठा लक्षात घेऊन सूत गिरण्यांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मर्यादित पुरवठ्यामुळे अगोदरच उत्पादन कमी आहे. तामिळनाडूतील स्पिनिंग मिल संघटनेनं सर्वच सूत गिरण्यांना सूताचं उत्पादन कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. कापसाची मागणी ,पुरवठा आणि दराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. नवीन पीक येईपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दर मिळू शकतील. यंदा कापसाची लागवडही गेल्यावर्षी पेक्षा जास्त आहे. 18 ऑगस्टपर्यंत देशात 124.17 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आलीये.गेल्या वर्षी याच काळात 116.51 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली होती.
कापसाचे नवीन पीक आल्यानंतर कापसाच्या पुरवठ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूत गिरण्यांना पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकतो. मात्र, कापसाचे दर कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे. सूत गिरण्यांना महाग दरात कापूस घेऊन धागा तयार करावा लागल्यास त्याचं ओझं मात्र शेवटी ग्राहकांच्या खिश्यावरच पडणार आहे. यामुळे येत्या काळात कपड्यांचे भाव वाढू शकतात.