मुंबई | 1 मार्च 2024 : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांना गेल्यावर्षी चलनातून बाहेर काढले आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 2000 रुपयांच्या एकूण 97.62 टक्के नोटा बॅंकेत परत आल्या आहेत. आता केवळ 8,470 कोटी रुपये किंमतीच्या 2000 च्या नोटा बॅंकांकडे परक आलेल्या नाहीत. आरबीआयने 19 मे 2023 रोजी देशातील चलनातील सर्वात मोठी करन्सी नोट असलेल्या 2000 रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय रिझर्व्ह बॅंकने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला होता. या दोन हजार रुपयांच्या नोटांना बदलण्यासाठी 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. देशातील सर्व बॅंकांमध्ये या नोटा बदलण्याची मुभा दिली होती. आता सर्वसामान्य बॅंका आणि इतर ठिकाणी या 2000 च्या नोटा परत करण्याची सुविधा आता बंद केलेली आहे. जर कोणाला 2000 रुपयांच्या नोटा बदलायच्या असतील तर त्या नोटांना पोस्टाद्वारे रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवाव्या लागणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2000 ची नवी नोट नोव्हेंबर 2016 रोजी जारी केली होती. त्यावेळी सरकारने नोटबंदी जाहीर करीत जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 1000 रुपयाची नोट सर्वात मोठी चलनी नोट होती. आरबीआयने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 2000 च्या नोटांची छपाई देखील बंद केली होती. आणि मे 2023 मध्ये तिला चलनातून बाद केले होते. आता 500 रुपयांची नोट सर्वात मोठी चलनी नोट आहे.