नवी दिल्ली | 17 February 2024 : पेटीएमवर सध्या सर्व ग्रह रुसले असे वाटत असतानाच एक आनंदाची बातमी येऊन धडकली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईचा आसूडा उगारला. त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार 29 फेब्रुवारी नंतर ठप्प होणार आहे. यामुळे ग्राहक, वॉलेट, खाते, फास्टटॅग आणि इतर पेटीएम बँकिंग सेवांचा उपयोग 15 मार्चपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेला व्यवहार करता येणार नाही. पण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे मुख्य खाते, नोडल अकाऊंट आता एक्सिस बँकेत (Axis Bank) हस्तांतरीत करण्यात आले आहे.
मुख्य खाते म्हणजे काय
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड नोडल खात्याच्या आधारे व्यवहार सांभाळते. केंद्रीय बँकेच्या कारवाईनंतर ग्राहकांचे काय होणार याची चिंता लागली होती. जर इतर बँकेत हे खाते हस्तांतरीत झाले नसते तर UPI सेवा सुस्थितीत चालविणे अवघड झाले असते. पण आता Axis Bank मध्ये नोडल अकाऊंट हस्तांतरीत झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
या सेवा विना अडथळा सुरु
पेटीएमच्या या निर्णयाने 15 मार्चनंतर पण पेटीएम क्यूआर, साऊंडबॉक्स आणि कार्ड मशीन सुरळीतपणे सुरु राहण्यासाठीची परवानगी मिळेल. पेटीएमने याविषयी जाहीर केलेल्या भूमिकेनुसार, नोडल अकाऊंट एक्सिस बँकेत हस्तांतरीत केल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांना विना अडथळा व्यवहार करता येणार आहे.
15 मार्चनंतर नाही चालणार या सेवा
आरबीआयने यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे पेटीएम जर इतर बँकेसोबत संलग्न झाले तर आरबीआय पेटीएम क्यूआर कोड, पेटीएम साऊंडबॉक्स , पेटीएम पीओएस टर्मिनल सारख्या सेव सुरु राहतील. पण 15 मार्च 2024 नंतर ग्राहक खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, वॉलेट, फास्टटॅग, रोख जमा-काढणे, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, क्रेडिट व्यवहार करता येणार नाहीत.
पेटीएमच्या शेअरमध्ये उसळी
आरबीआयच्या कारवाईनंतर गेल्या शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी पडझड दिसून आली होती. तर पेटीएमच्या शेअरमध्ये 36% घसरण झाली होती. या कंपनीचे बाजारातील मूल्य 2 अब्ज डॉलरने घसरले होते. या घसरणीनंतर आज, 16 फेब्रुवारी रोजी पेटीएमच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसले. आज पेटीएमचा शेअर 0.20 टक्क्यांनी वाढून 325.70 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये 21 टक्क्यांची घसरण दिसून आली.