अमेरिकेतली दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे हे जगातील टॉप श्रीमंतांपैकी एक आहेत. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, त्यांची नेटवर्थ आजच्या घडीला 129 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1,07,54,00,11,50,000 रुपये इतकी आहे. ते जगातील 10वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 93 वर्षांचे वॉरेन बफे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूपत्रात बदल केला आहे. जग सोडून गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीचे वारस कोण असेल याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यांच्या बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला दान देण्याविषयीची कोणतीही नवीन योजना नाही. तर त्यांच्या संपत्तीसाठी एक नवीन चॅरिटेबल ट्रस्ट तयार करतील. ही सेवाभावी संस्था त्यांची तीन मुले चालवतील.
बिल गेट्स फाऊंडेशनला नाही मिळणार खडकू
बफे यांनी एका मुलाखतीत, त्यांच्या मृत्यूनंतर बिल गेट्स फाऊंडेशनला एक नवा पैसा मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. मी अनेकदा माझे मृत्यूपत्र बदलवले आहे. आता ही त्यात बदल केल्याचे त्यांनी सांगितले. नवीन धोरणानुसार, त्यांची संपत्ती नवीन सेवाभावी संस्थेला मिळेल. हे ट्रस्ट त्यांचे तीन मुले चालवतील. तीनही मुले सध्या त्यांच्या सेवाभावी संस्था चालवत आहेत. यापूर्वी त्यांच्या संपत्तीपैकी 99 टक्के रक्कम त्यांच्या कुटुंबातील चार ट्रस्टला आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला देण्याचे ठरले होते.
बफे यांच्याकडे किती शेअर
बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेनुसार, बफे यांच्याकडील जवळपास 9000 क्लास ए शेअर आता 13 दशलक्षहून अधिक क्लास बी शेअरमध्ये बदलणार आहेत. यातील 9.3 दशलक्ष शेअर हे बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला मिळतील. उर्वरीत शेअर हे बफे यांच्या कुटुंबियांशी संबंधित ट्रस्टमध्ये वाटण्यात येतील. बफे यांनी गेल्या 18 वर्षांत बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनला जवळपास 43 अब्ज डॉलरची संपत्ती दान केली आहे. मेलिंडा यांनी गेल्यावर्षी या फाऊंडेशनपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. बफे यांनी गेल्या वर्षी त्यांच्या कौटुंबिक ट्रस्टला 870 दशलक्ष डॉलर दान केले होते. सध्या बफे यांच्याकडे उरलेल्या शेअरची किंमत 128 अब्ज डॉलर म्हणजे 12800 कोटी रुपये इतकी आहे.