नवी दिल्ली | 23 January 2024 : गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य नागरीक महागाईने होरपळलेला आहे. त्यातच ज्यांनी गृहकर्ज अथवा इतर कर्ज घेतले आहे. ते वाढलेल्या ईएमआयने हैराण आहेत. करदात्यांना, नोकरदार वर्गाला या बजेटमध्ये मोठ्या सवलतींची आपेक्षा आहे. त्यांना महागाईशी दोन हात करण्यासाठी केंद्राकडून आर्थिक दिलासा हवा आहे. लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. बजेट सत्र संपल्यानंतर केव्हा पण निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे या बजेटकडून पगारदारांना मोठ्या अपेक्षा आहे. त्यांना काही केल्या दिलासा हवा आहे. नाही तर कदाचित त्याचा प्रतिकूल परिणाम पण दिसून येऊ शकतो. अर्थसंकल्पात त्यांना मोठी घोषणा अपेक्षित आहे.
नोकरदारांचे सर्वाधिक हाल
देशात मध्यमवर्गाचे सर्वाधिक हाल असल्याचे चित्र आहे. त्यांच्यासाठी कोणतीही मोठी योजना या घडली नाही. करदाते असल्याने त्यांना दुर्बल घटकांच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. ईएमआय वाढलेला आहे. किचन बजेट तर गेल्या एका वर्षांपासून कोलमडलेले आहेत. मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चाने मध्यमवर्ग मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच त्याला उत्पन्नावर कर भरावा लागत असल्याने त्याची ससेहोलपट सुरु आहे. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असला तरी या वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. सरकार महागाईच्या आघाडीवर सपशेल फेल ठरली असली तरी, सवलती देण्यात सरकारे कंजुषी करु नये, अशी माफक अपेक्षा या वर्गाची आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण बजेट सादर होईल, पण या वर्गाला अगोदरच घोषणा होण्याची अपेक्षा अधिक आहे.
काय आहेत 5 मोठ्या अपेक्षा
काय सरकार कसोटीवर खरं उतरणार?
कर व्यवस्थेविषयी आजही लाखो भारतीयांच्या मनात संभ्रम आहे. नव तरुण वर्ग दोन कर प्रणालीमुळे संभ्रमात आहे. त्यांच्यासाठी कोणती कर प्रणाली योग्य असेल, या विचारात तो आहे. स्टँडर्ड टॅक्स रिझिम बाबत एक स्पष्ट, पारदर्शक आणि समान धोरण आखावे, अशी अपेक्षा अनेक करदात्यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही कर पद्धत लागू ठेवणार असतील तर दोन्हीमध्ये करदात्यांना मोठा दिलासा आणि पारदर्शकता आणावी. अंतरिम बजेटमध्ये 80सी आणि 80डी अंतर्गत मोठी सवलत देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते, सरकार या बजेटमध्ये कोणताही मोठा दिलासा देण्याची शक्यता तशी कमीच आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यापूर्वीच असे संकेत दिले आहे. नवीन कर व्यवस्थेत सध्या 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. ते 9 ते 10 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे.