तीव्र उन्हाळ्यानंतर मुसळधार पावसाने भाजीपाला महागला आहे. टोमॅटोच नाही तर इतर अनेक भाजीपाल्याच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर होणार आहे. पण त्यापूर्वीच महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत भाजीपाला महागल्याने सामान्य हैराण झाला आहे. टोमॅटो, कांदा आणि बटाट्यांनी शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. खिशातील शंभरची नोट सुद्धा या तीन भाजीपाल्यांपुढे तोकडी ठरली आहे. गेल्यावर्षी टोमॅटोने देशवासियांना रडवले होते. त्यानंतर केंद्र सरकारने उत्तर भारतात विशेष विक्री केंद्र सुरु केली. नेपाळमधून टोमॅटो आयातीवरील निर्बंध हटवले. तेव्हा किंमती आटोक्यात आल्या.
दिल्लीसह अनेक राज्यात टोमॅटोचे शतक
देशातील विविध भागात दमदार पावसाने खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत टोमॅटोचा भाव किलोमागे 100 रुपयांवर होता. देशातील अनेक राज्यात पण टोमॅटोचा दर गगनाला पोहचला आहे. राज्यातील अनेक शहरात पण टोमॅटोने शतक झळकावले आहे. ग्राहक मंत्रालयानुसार टोमॅटोची किरकोळ बाजारातील किंमत 93 रुपये प्रति किलो होती. तर 20 जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार किलोमागे सरासरी 73.76 रुपये भाव होता.
दरवाढीचे कारण काय
भीषण उष्णता आणि त्यानंतर देशातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढल्याने भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम दिसून आला. भाजीपाल्याची आवक घटली. तर भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे भाजीमंडीत, बाजारात, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. टोमॅटो, कांदा आणि बटाटे महागले. इतर भाजीपाला पण महागला. ग्राहकांच्या खिशावर ताण आला.
बटाटे आणि कांद्याचा भाव
दिल्लीत शनिवारी कांदा 46.90 रुपये प्रति किलो तर बटाटे 41.90 रुपये प्रति किलो दराने विकला गेला. सरकारी आकड्यांनुसार, दिल्लीत काही भागात कांद्याचा दर 50 रुपयांवर गेला आहे. देशात किलोमागे सरासरी 44.16 रुपये दराने कांद्याची विक्री होत आहे. काही भागात हा भाव 37.22 रुपये प्रति किलो आहे. इतर भाजीपाल्याच्या किंमतीत पण चांगलीच वाढ झाली आहे. भाजीपाला खरेदी करण्यास गेल्यास 100 रुपयांची नोट सुद्धा पुरत नाही. त्यात एक-दोन भाज्या येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.