नवी दिल्ली | 1 February 2024 : संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम बजेट सादर केले. सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात कर रचनेत कुठलाही बदल केला नाही. बजेटमध्ये करदात्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. सीतारमण यांनी आयात शुल्कासह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करा संबंधीचा प्रस्ताव सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अंतरिम अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विकासीत भारताची गॅरंटी दिली. तर हे बजेट भारताच्या विकासाचा पाया मजूबत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वसामावेश बजेट
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अंतरिम बजेट सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विकासाचा भरवसा दिला. हा विकास सातत्यपूर्ण होईल असे ते म्हणाले. विकासीत भारताचे चार प्रमुख स्तंभ – तरुण, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. हे बजेट 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र करण्याची गँरटी देत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन कोटी घरे तयार करण्याचे लक्ष
आम्ही एक मोठं उद्दिष्ठ ठरवतो आणि ते प्राप्त करण्यासाठी त्यापेक्षा आणखी मोठे उद्दिष्ठ समोर ठेवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गावातील आणि शहरातील गरीबांना 4 कोटींहून अधिक घरे देण्याचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यात आले आणि आता 2 कोटी घरांचे उद्दिष्ठ गाठायचं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात दोन कोटी लखपती दीदी तयार करण्याचे लक्ष्य होते. ते वाढवून आता तीन कोटी करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
भारताचा पाया मजबूत होणार
पीएम मोदी यांनी हे बजेट भारताचा पाया मजबूत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बजेट हे विकसीत भारताच्या चार स्तंभावर आधारीत आहे. त्यात युवक, गरीब, शेतकरी आणि महिलांच्या विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वित्तीय तोटा कमी करण्यावर हे सरकार भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हे भविष्यातील बजेट असल्याचे त्यांनी सांगितले.