नवी दिल्ली | 26 January 2024 : 1 फेब्रुवारी जस-जशी जवळ येत आहे, बजेटशी संबंधित चर्चा रंगत आहे. माध्यमांसह गावाच्या पारावर पण मोदी सरकार काय चमत्कार करणार याचीच चर्चा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून 1 फेब्रुवारीपासून देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा सुरु झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करणार आहेत. यंदा लोकसभेच्या निवडणूका असल्याने या बजेटकडून सर्वसामान्यांसह प्रत्येक वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. सत्तेत येणारे नवीन सरकार पूर्ण बजेट सादर करेल. पण तुम्हाला माहिती आहे का, बजेट हा शब्द आला कुठून, हे नाव त्याला कसे पडले?
Budget हे नाव पडले तरी कसे?
बजेट हा शब्द फ्रेंच भाषेतील शब्द बूजेमधून आला आहे. बूजेचा अर्थ एक छोटी थैली असा होतो. आता तुम्हाला वाटत असेल की थैली आणि बजेटचा संबंध आहे तरी काय? तर त्यामागे एक रोचक कथा आहे. इंग्लंडचे तत्कालीन अर्थमंत्री सर रॉबर्ट वालपोल 1733 मध्ये एका छोट्या थैलीत बजेटसंबंधीची कागदपत्रे घेऊन संसदेत पोहचले होते. ज्यावेळी त्यांना काही लोकांनी या थैलीविषयी आणि त्यात काय आहे, अशी विचारणा केली, त्यावेळी सर्वांसाठी बजेट असल्याचे ते म्हणाले. तेव्हापासून हा बजेट शब्द रुढ झाला.
राज्यघटनेत तर बजेट शब्दच नाही
तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण भारतीय राज्यघटनेत बजेट हा शब्द वापरण्यात आलेला नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरण असा शब्द वापरण्यात आला आहे. या विवरणात केंद्र सरकार संपूर्ण वर्षाचा अंदाजित खर्च आणि सरकारला होणारा महसूल, उत्पन्न यासंबंधीची सविस्तर माहिती सादर करते.
योजनांचा लेखा-जोखा
सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचा खर्च आणि कमाई यांचा लेखाजोखा असतो. घराच्या बजेटमध्ये किती कमाई, पैसा कुठे खर्च होणार आणि बचत किती होणार याचा अंदाज लावण्यात येतो. दर महिन्याच्या सरावातून त्याचा एका घाऊक अंदाज येतो. सरकार पण इतक्या वर्षाच्या अनुभवातून हे ठोकताळे मांडत असते. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पैशाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येते. त्याचे नियोजन करण्यात येते. पैशाची आवक आणि जावक याची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
निवडणूक वर्षांत दोनदा अर्थसंकल्प
लोकसभा निवडणूक वर्षात अर्थसंकल्प दोनदा सादर करण्यात येतो. सत्ताधारी पक्ष प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्प सादर करतो. नवीन सरकार आले तर ते योजना, ध्येय धोरण यामध्ये बदल करते. त्यामुळे निवडणूक वर्षात फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर होते. तर नवीन सत्ताधारी पूर्ण बजेट सादर करतात.
वोट ऑन अकाऊंट आणि अंतरिम बजेटमधील अंतर
अंतरिम बजेटमध्ये नवीन सरकार स्थापन होईपर्यंतच्या खर्चाची तरतूद करण्यात येते. यामध्ये पैसा कुठून आणि कसा येणार तर पैसा कुठे आणि कसा खर्च होणार याचा ताळेबंद मांडण्यात येतो. एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरु होत असल्याने नवीन सरकार स्थापन होईपर्यंतच्या खर्चाची तरतूद अंतरिम बजेटमध्ये करण्यात येते. वोट ऑन अकाऊंट हे अंतरिम बजेटचाच एक भाग असतो. त्यात खर्चाची आकडेमोड सादर करण्यात येते. ते विना अडथळा मंजूर होते. अंतरिम बजेटवर मात्र संसदेत चर्चा करण्यात येते.