नवी दिल्ली | 21 January 2024 : 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये त्या पहिले अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. भारतीय जनता पार्टीने 2019 रोजी सलग दुसरी सार्वत्रिक निवडणूक जिंकल्यानंतर निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. पूर्णवेळ अर्थमंत्री असताना पण निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. मग केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला कोण आहे, माहिती आहे का?
आर्यनलेडीने सादर केले बजेट
देशाची आर्यनलेडी, म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी 1970-71 मध्ये केंद्रीय बजेट सादर केले. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्या पंतप्रधान होत्या. पहिल्या महिला पंतप्रधान आणि पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 1971 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी अर्थमंत्रालयाचा कारभार हाती घेईपर्यंत त्यांनी काही काळ या पदावर काम पाहिले.
निर्मला सीतारमण पूर्णवेळ अर्थमंत्री
भारताचे पहिले बजेट 7 एप्रिल 1860 रोजी ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी सादर केले होते. तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर. के. षणमुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला होता. 2019 मध्ये निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रालय आले. त्या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या.
सर्वात दीर्घ बजेट भाषणाचा रेकॉर्ड
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर अजून एक खिताब आहे. केंद्रीय बजेट 2020 मध्ये त्यांनी दीर्घ भाषण केले होते. 2 तास 42 मिनिटांचे हे भाषण होते. तर गेल्यावर्षी त्यांनी जवळपास 1.5 तास अर्थसंकल्पीय भाषण केले. आता मोदी सरकारचे हे अंतरिम बजेट आहे. या बजेटकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा असल्या तरी या बजेटकडून मोठ्या अपेक्षा न ठेवण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे. तरीही लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने मोदी सरकार सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.