मुंबई, देशातील दुसरे सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय पसरवण्यात गुंतले आहेत. दरम्यान, आणखी एक कंपनी त्याच्या पदरात पडणार आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारतात मेट्रो एजी (Metro AG) या जर्मन कंपनीचा घाऊक व्यवसाय खरेदी करण्याच्या शर्यतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही एकमेव कंपनी दावेदार आहे. अंबानींना देशातील रिटेल क्षेत्रात वर्चस्व गाजवायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांमधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
थायलंडस्थित कंपनी Charoen Pokphand Group Co. देखील हीच कंपनी करंदी करण्यासाठी उत्सुक होती. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार त्यांची मेट्रोशी खरेदी विक्रीच्या व्यवहारासंबंधी कुठलीच चर्चा सुरू नसल्याचे कळते. म्हणजेच आता मेट्रोचा कॅश अँड कॅरी व्यवसाय खरेदी करण्याच्या शर्यतीत फक्त रिलायन्स उरली आहे. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
या कराराचे मूल्य $1 अब्ज ते $1.2 बिलियन पर्यंत असू शकते. यात कर्जाचाही समावेश आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये मूल्यांकनासह तपशीलांवर चर्चा केली जात आहे. मेट्रो आणि रिलायन्सच्या प्रतिनिधींनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
मेट्रोने 2003 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि सध्या देशात 31 घाऊक वितरण केंद्रे आहेत. कंपनीच्या मुख्य ग्राहकांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोटे किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी रिटेल उत्पादनांची विक्री करणारी कंपनी आहे. घाऊक व्यवसायाच्या आगमनाने, त्याची स्थिती आणखी मजबूत होईल. ॲमेझॉननेही मेट्रोच्या व्यवसायात रस दाखवला होता.