जर तुम्ही घर खरेदीची योजना आखत असाल तर तुमचे घर खरेदीचे स्वप्न अजून महाग होणार आहे. वाढती महागाई आणि बांधकाम साहित्याच्या किंमती वधारल्याने घर खरेदी ही अनेकांसाठी स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. रहिवाशी मालमत्तांचे भाव गगनाला भिडले आहेत. याविषयीचा एक अहवाल समोर आला आहे, त्यानुसार, मोठ्या शहरात घर खरेदी 19% पर्यंत वाढणार आहे. या अपडेटमुळे देशातील रिअल मार्केटमध्ये तेजीचे वारे वाहत आहे.
महागाईसह मागणीत वाढ
नाईट फ्रँक आणि नारेडको यांनी 2024 मधील पहिल्या तिमाहीत रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स जाहीर केला आहे. त्यामध्ये देशातील रिअल इस्टेट सेक्टरविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, घरांच्या किंमती वाढलेल्या असल्या तरी मागणीवर त्याचा परिणाम होणार नाही. किंमती मागणीनुसार वाढतील.
बांधकाम क्षेत्राला मोठा फायदा
रिअल इस्टेट कन्सल्टंट नाईट फ्रँक आणि बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संस्था नारेडकोने 2024 च्या पहिल्या तिमाहीत, जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंतचा रिअल इस्टेट सेंटीमेट इंडेक्स जाहीर केला. इंडेक्स हा 69 क्रमांकावरुन आता 72 व्या क्रमांकावर पोहचला आहे. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा मागणी आणि किंमती दोन्ही वधारल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत मार्गाक्रमण करत असल्याने बांधकाम क्षेत्राला तेजीची आशा आहे.
घराच्या किंमती महागणार
रिपोर्टनुसार, 2024 मधील पहिल्या तिमाहीत रहिवाशी घरांचा बाजार चांगली कामगिरी दाखविण्याची शक्यता आहे. किंमतींमध्ये घसरणीची कोणतीच शक्यता नाही. तर मागणी कमी होण्याची शक्यता पण कमीच आहे.ग्राहकांना पुढील सहा महिन्यापर्यंत किंमतीत कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. तर बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस येणार आहेत. पण या सर्व घडामोडींचा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे. वाढत्या महागाईने त्यांचे बजेट पूरते कोलमडून गेले आहे. तर आता त्यांच्या घराच्या स्वप्नाला पण सुरुंग लागला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर अनेक शहरात एका वर्गाकडे घर खरेदी करण्याची क्षमता असेल. तर इतरांना भाड्याच्या, किरायच्या घरात आयुष्य काढण्याची वेळ येऊ शकते.